नवी दिल्ली - स्मार्टफोनचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र आता सध्या कोरोनाच्या काळात त्याचा वापर हा आणखी वाढल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या संकटात लोकांच्या स्क्रिनटाईम म्हणजेच स्मार्टफोन किंवा लॅपटॉपवर घालवण्यात आलेला वेळ वाढता आहे. स्मार्टफनन तयार करणारी कंपनी वीवोने भारतात स्मार्टफोनचा वापर किती वेळ केला जातो याबाबत एक सर्व्हे जारी केला आहे. यामध्ये भारतीयांकडून स्मार्टफोनच्या वापरात 25 टक्के वाढ झाल्याचं म्हटलं आहे.
कोरोना काळात वर्क फ्रॉम होम आणि मनोरंजन आणि इतर गोष्टींसाठी स्मार्टफोनचा वापर वाढला आहे. लोक आपल्या गरजेनुसार या गॅजेट्सचा वापर करतात. सीएमआरने मोबाईल कंपनी वीवोच्या वतीने हा रिसर्च केला आहे. रिपोर्टनुसार, मार्च 2020 मध्ये भारतीयांकडून स्मार्टफोनचा वापर 11 टक्क्यांनी वाढून 5.5 तास प्रतिदिनवर पोहचला आहे. तर एप्रिलमध्ये 25 टक्के आणखी वाढून 6.9 तास प्रतिदिनवर पोहचला आहे. हाच वेळ 2019 मध्ये सरासरी 4.9 तास होता.
स्मार्टफोन आणि त्याचा मानवी संबंधांवर होणारा परिणाम - 2020 या रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊननंतर भारतीय आपल्या स्मार्टफोनवर अधिक वेळ घालवतात. वर्क फ्रॉम होमसाठी स्मार्टफोनचा वापर 75 टक्क्यांनी वाढला आहे. तर कॉलिंगसाठी 63 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे नेटफ्लिक्स, स्पॉटिफायसारख्या ओव्हर द टॉप सेवांसाठी स्मार्टफोनच्या वापरात 59 टक्क्यांची वाढ झाली आहे.
स्मार्टफोनवर गेम खेळण्याचं प्रमाणही वाढलं
सोशल मीडियासाठी स्मार्टफोनचा वापर 55 टक्क्यांनी वाढला आहे. स्मार्टफोनवर गेम खेळण्याचं प्रमाणही वाढलं आहे. गेमिंगसाठी यात 45 टक्क्यांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे फोटो काढण्यासाठी आणि सेल्फी घेण्यासाठी स्मार्टफोनचा वापर प्रतिदिन 14 मिनिटांनी वाढून 18 मिनिटांवर पोहचला आहे. या रिसर्चमध्ये आठ शहरांतील 15 ते 45 वयोगटातील जवळपास 2000 लोकांची मतं घेण्यात आली. यात 70 टक्के पुरुष आणि 30 टक्के महिलांचा समावेश आहे.
वीवो इंडियाचे संचालक निपुण मार्या यांनी दिलेल्या माहितीनुसार, "कंपनीने अशाच प्रकारचा रिसर्च गेल्या वर्षीही केला होता. स्मार्टफोन हे सर्वात उत्तम माध्यम असल्याचं सर्वच जाणतात. खासकरून कोरोना काळात स्मार्टफोन अतिशय महत्त्वाचा ठरला. मात्र स्मार्टफोनच्या अति वापराचा प्रतिकूल परिणाम होतो. स्मार्टफोनचं एडिक्शन होत आहे. 84 टक्के लोकांनी ते सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी पहिले 15 मिनिटं फोन बघत असल्याचं सांगितलं."
"कोरोनानंतर परिस्थिती सामान्य झाल्यानंतर स्मार्टफोनच्या वापरात काहीशी कमी येईल"
जवळपास 46 लोकांनी ते मित्रांसोबत एका तासाच्या बैठकीवेळी कमीत-कमी पाच वेळा आपला फोन उचलतात असं सांगितलं. कोरोनानंतर परिस्थिती सामान्य झाल्यानंतर स्मार्टफोनच्या वापरात काहीशी कमी येईल, काही बदल होतील. मात्र कोरोना काळात झालेले काही बदल कायम राहतील असं देखील निपुण मार्या यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.