नवी दिल्ली : मोबाईल फोन (Mobile Phones) हा आपल्या जीवनाचा एक अतिशय महत्वाचा भाग बनला आहे. बहुतेक कामांमध्ये मोबाईलचा वापर सुरू झाला आहे. यामुळे काम खूप सोपे होते. मात्र, यामुळे अनेकवेळा लोकांना नुकसानही सहन करावे लागते. या संदर्भात वेळोवेळी अलर्ट सुद्धा जारी केला जातो.
एका अॅडव्हायझरीनुसार, जर तुम्ही सार्वजनिक ठिकाणी फोन चार्ज करत असाल तर तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. अनेक वेळा आपण रेल्वे स्टेशन, विमानतळ किंवा इतर ठिकाणी उपलब्ध असलेल्या सॉकेटमध्ये चार्जर लावून फोन चार्ज करू लागतो. परंतु, यामुळे तुमची वैयक्तिक माहिती चोरीला जाऊ शकते.
यासंदर्भात ओडिसा पोलिसांनी अलर्ट जारी केला आहे. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी मोबाईल चार्जिंग स्टेशन, यूएसबी पॉवर स्टेशन आणि दुसऱ्या ठिकाणी मोबाईल चार्जिंग करू नका, असे म्हटले आहे. तसेच, सायबर घोटाळेबाज तुमच्या फोनमध्ये मालवेअर इन्स्टॉल करून तुमची वैयक्तिक माहिती मोबाईलवरून चोरू शकतात, असेही ओडिसा पोलिसांनी ट्विट केले आहे.
दरम्यान, असा अलर्ट देण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही सार्वजनिक ठिकाणी मोबाईल चार्जिंगबाबत इशारा देण्यात आला आहे. अलीकडेच हैदराबादच्या सायबर पोलिसांनीही एक इशारा दिला आहे. 5G सिम अपग्रेडच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली जात असल्याचे सायबर सेलच्या वतीने सांगण्यात आले.
अज्ञात लिंक्सपासून सावध राहण्याची गरजस्कॅमर्स मोबाईल युजर्सचे सिम ब्लॉक करतात आणि त्यांच्या खात्यातून पैसे काढतात. यासाठी स्कॅमर्सकडून मोबाईल यूजरला लिंक पाठवली जाते. युजर्स या लिंकवर क्लिक करताच, त्यांच्या बँक खात्याशी संबंधित अनेक माहिती स्कॅमर्सपर्यंत पोहोचली जाते. त्यानंतर ते त्याचा वापर फसवणुकीसाठी करतात. यामुळे तुम्हाला अशा कोणत्याही अज्ञात लिंक्सपासून सावध राहण्याची गरज आहे.