मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये तुम्ही स्मार्टफोनचा स्फोट झाल्याच्या अनेक गंभीर घटना ऐकल्या असतील. कधी चार्जिंगला लावलेल्या फोनचा स्फोट झाला तर कधी खिशातच फोनचा स्फोट झाला. आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यात एक व्यक्ती मोबाइल बोलत असताना मोबाइलचा स्फोट झाला. यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार त्याने मोबाइल चार्जिंगला लावला होता. अचानक व्होल्टेज वाढल्याने मोबाइलला आग लागली आणि तो व्यक्तीही आगीत भस्मसात झाला.
फोनमध्ये स्फोट होण्याची कारणे अनेकांना माहीत नसतात. त्यामुळे जाणून घेऊया फोनमध्ये स्फोट होण्याची आणि आग लागण्याची कारणे..
चार्जिंगला लावलेला फोन वापरु नका
फोन फुटण्याच्या कारणांमध्ये मुख्य कारण आहे ओव्हर हिटींग. फोनच्या अति वापरामुळे पोन गरम होतो. चार्जिंगला फोन लावल्यावर त्याचा वापर करु नका. फोन पूर्णपणे चार्ज होऊ द्या. त्यावर गेम खेळू नका किंवा आणखी कोणतही काम करु नका. चार्जिंगला लावलेल्या फोनवर बोलणे तुमच्यासाठी सर्वात महागात पडू शकतं. शक्य झाल्यास फोन स्विच ऑफ करुन चार्जिंग करा.
रात्रभर फोन चार्जिंगला लावू नका
काही लोकांना फोन रात्रभर चार्जिंगला लावून झोपण्याची सवय असते. असे करणे फारच धोकादायक आहे. ओव्हर चार्जिंगही फोन फुटण्याचं एक मुख्य कारण आहे.
ओरिजीनल चार्जरचाच वापर करा
अनेकदा चार्जर खराब झाल्यावर अनेकजण पैसे वाचवण्यासाठी स्वस्त चार्जर खरेदी करतात. पण असे करणे फारच घातक आङे. ज्या कंपनीचा फोन आहे त्या कंपनीचाच चार्जर विकत घ्यावा. असे करुन तुम्ही संभावित धोका टाळू शकता.
सूर्याच्या थेट किरणांपासून दूर ठेवा
फोन कधीही अशा जागी ठेवू नका जिथे त्यावर सूर्याची किरणे थेट पडतील. सूर्यांच्या किरणांमुळे फोनची बॉडी गरम होते आणि यानेही ओव्हर हिटींग होते. याने फोनचा बॅलन्स बिघडतो आणि फोन फुटण्याचा धोका वाढतो.
GPS अॅप्स
काही अॅप्समुळेही फोन गरम होतो. अनेकदा GPS नॅविगेशन अॅप्स वापरताना ही समस्या येते. गुगल मॅप्स, उबेर, ओलासारखे GPS लोकेशन बेस्ड अॅप वापरल्याने फोन ओव्हरहिटींग करतो. अशावेळी या अॅप्सचा वापर कमी करा आणि कारण नसताना हे अॅप्स ओपन करु नका.