नवी दिल्ली - डिजिटल युगात ऑनलाइन व्यवहार करण्याचे अनेक अॅप्स सध्या प्ले स्टोअरवर आलेले आहेत. यात चर्चेत असणारा अॅप्स म्हणजे Paytm. तुम्ही जर हा अॅप्स वापरत असाल तर सावध राहा. स्मार्टफोन युजर्ससाठी Paytm कडून सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. युजर्सकडून KYC भरताना सावध राहणे गरजेचे आहे असं Paytm ने सांगितले आहे. Paytm ने नोटिफिकेशन जारी करुन युजर्सला केवायसीसाठी एनीडेस्क अथवा क्विकसपोर्ट सारखे अॅप्स डाऊनलोड करु नका असं आवाहन करण्यात आलं आहे.
नोटिफिकेशनमध्ये सांगण्यात आलं आहे की, एनीडेस्क अथवा क्विकसपॉर्टसारखे अॅप्स डाऊनलोड केल्याने युजर्सच्या खात्यातील पैसे चोर होण्याची शक्यता आहे. यापूर्वी बँकांनीही ग्राहकांना अशाप्रकारे सूचना केल्या आहेत. हे अॅप्स डाऊनलोड करुन लोकांची आर्थिक फसवणूक करण्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. यावर्षीच्या सुरुवातीलाच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेही लोकांना अशाप्रकारच्या अॅप्सपासून सावध राहा असं आवाहन केले आहे. इतकचं नाही तर अशा प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता देशातील काही बँकांनी जसे एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि एक्सिसनेही ग्राहकांना हे अॅप्स डाऊनलोड न करण्याचा सल्ला दिला आहे.
फसवणुकीसाठी चुकीचा वापर ग्राहकांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी बँक एक्झिक्युटिव्ह बनून फोन केला जातो. फोनवर संवाद साधल्यानंतर ग्राहकांच्या बँक खात्याशी निगडीत सगळी माहिती गोळा केली जाते. फोनवरुन ते सांगत असलेल्या स्टेप्स फॉलो न केल्यास तुमची नेट बँकिंग सुविधा ब्लॉक होऊ शकते अशाप्रकारे ग्राहकांना भीती दाखविली जाते. त्यामुळे ब्लॉक होण्याच्या भीतीने ग्राहक समोरील व्यक्तीला बँकेशी निगडीत सगळी माहिती देतो अशाने ग्राहकांची आर्थिक फसवणूक केली जाते.
ग्राहकांना आपल्या जाळ्यात खेचण्यासाठी ऐनी डेस्क अथवा टीमव्यूअर अॅप्ल डाऊनलोड करण्यास सांगितले जाते. अॅप्स डाऊनलोड केल्यानंतर ग्राहकांना व्हेरिफिकेशन करण्यासाठी 9 अंकाचा कोड मागितला जातो. या कोडच्या सहाय्याने ग्राहकांच्या मोबाईलमधील सगळ्या माहितीचा एक्सेस फसवणूक करणाऱ्यांना मिळतो. त्यामुळे हे तुमचे डिवाइस स्क्रीन मॉनिटर करतात. स्क्रीनवर दिसणारी माहिती रेकॉर्ड केली जाते. अॅप्स डाऊनलोड केल्यानंतर ग्राहक मोबाइल बॅकिंग, पेटीएम या UPI वरुन पेमेंट करतात त्याचे लॉगइन डिटेल्स सहजरित्या या अॅप्सद्वारे फसवणूक करण्यांना मिळते. त्यातून तुमच्या खात्यातून पैसे चोरी होण्याची शक्यता आहे.