Password leak with Keyboard Sound Technique: सध्याचे युग हे डिजिटल युग आहे. एका क्लिकवर आपल्या साऱ्या गोष्टी झटपट होतात. पण डिजिटल युगासोबतच सध्या अनेक प्रकारचे इंटरनेट फ्रॉड म्हणजेच फसवणुकीच्या गोष्टीही घडत असतात. अशीच एक बाब आता समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोणत्याही डिव्हाईसच्या कीबोर्डमधून निघणारा आवाज ऐकून त्याचा पासवर्ड चोरला जाऊ शकतो. हे केवळ Android वरच नाही तर आयफोन डिव्हाइसवर देखील केले जाऊ शकते असे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत हा सुरक्षेचा मोठा धोका असल्याचे तज्ञ्जांचे म्हणणे आहे.
रिपोर्ट काय सांगतो?
ZDnet च्या रिपोर्टनुसार, जेव्हा तुम्ही मोबाईल, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर टाइप करता, तेव्हा तुमच्या कीबोर्डमधून एक विशिष्ट प्रकारचा आवाज येतो. या कीबोर्डमधून येणारा आवाज ऐकून हॅकर्स तुमचा पासवर्ड शोधू शकतात. यासाठी एक विशेष तंत्रज्ञान वापरले जाते असा दावाही करण्यात आला आहे.तंत्रज्ञान कसे कार्य करते?
या तंत्रज्ञानाला ध्वनिक साइड चॅनल टेक्नॉलॉजी म्हणतात. यामध्ये हॅकर्स टायपिंग करताना तुमच्या कीबोर्डमधून येणारा आवाज काळजीपूर्वक ऐकतात. मग हे आवाज अडव्हान्स डिव्हाईसवर रेकॉर्ड करतात. त्यानंतर त्यांचे बारकाईने परीक्षण करतात. हे डिव्हाईस टाइप केले जाणारे अचूक अक्षरे आणि संख्या शोधून देते. हे हॅकर्सना तुमच्या अकाऊंटमध्ये सहज प्रवेश मिळवून देते. या संशोधन कार्यात 16 इंच Apple MacBook Pro वापरण्यात आला आहे. ज्यामध्ये AI च्या मदतीने कीबोर्डचा आवाज ऐकून मॅकबुकमध्ये काय टाईप केले जात आहे हे कळले. या संशोधनात त्याची अचूकता अंदाजे 95 टक्के होती. त्यामुळे आता यापासून युजर्सने आपला बचाव कसा करायचा, यावर अनेक तज्ञ्ज मंडळी विचार व संशोधन करत आहेत.