गेल्याच आठवड्यात ५ जी स्पेक्ट्रमचा लिलाव झालेला असताना देशात ही सेवा कधी सुरु होणार, याबाबत चर्चा सुरु होत्या. यातच रिलायन्स जिओने आपण १५ ऑगस्टलाच 5G सेवा सुरु करणार असल्याचे संकेत दिले होते. असे असताना जसे ४जीवेळी झाले तशी संधी जिओला मिळेल म्हणून एअरटेलने मोठी घोषणा केली आहे.
एअरटेल ऑगस्टमध्येच 5G सेवा सुरु करणार आहे. ऑगस्टच्या अखेरीपर्यंत 5G नेटवर्क सर्विस सुरु होण्याची शक्यता आहे. एरिक्सन, नोकिया आणि सॅमसंग सोबत 5G नेटवर्क प्रदान करण्यासाठी करार केला आहे. जर 15 ऑगस्टला Jio ची 5G सेवा लाँच झाली नाही तर Airtel पहिली कंपनी बनेल, असे म्हटले आहे.
नुकताच 5G स्पेक्ट्रमचा लिलाव संपला आहे. एअरटेल कंपनीने लिलावात 900 मेगाहर्ट्झ, 1800 मेगाहर्ट्झ, 2100 मेगाहर्ट्झ, 3300 मेगाहर्ट्झ आणि 26 गीगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सीमध्ये 19867.8 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम विकत घेतले होते. एअरटेलचे एमडी आणि सीईओ गोपाल विठ्ठल यांनीच ऑगस्टमध्ये एअरटेल फाईव्ह जी सेवा सुरु करत असल्याची घोषणा केली आहे.
भारतच्या ग्राहकांना 5G कनेक्टिव्हिटीचा पूर्ण लाभ देण्यासाठी कंपनी जगभरातील सर्वोत्तम तंत्रज्ञान वापरणार आहे. एअरटेल ही तिन्ही टेलिकॉम कंपन्यांमध्ये 5G नेटवर्कची चाचणी घेणारी पहिली टेलिकॉम ऑपरेटर होती. भारताचा पहिला 5G अनुभव थेट 4G नेटवर्कवर देखील दाखवण्यात आला. एअरटेलने ग्रामीण भागात देखील 5G चाचणी केली आहे. 5G वर पहिल्या क्लाउड गेमिंग अनुभवाची चाचणी देखील केली आहे.