Windows 11 लवकरच सर्व पीसी युजर्ससाठी अधिकृतपणे उपलब्ध होणार आहे. परंतु त्याआधी या ऑपरेटिंग सिस्टम संबंधित एका मालवेयरची माहिती समोर आली आहे. विंडोज 11 की थीमवर आधारित मालवेयर कँपेनच्या माध्यमातून लोकांना फसवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यातील एका कँपेनचे नाव Windows 11 Alpha आहे. लोकांच्या अज्ञानाचा आणि कमी माहितीचा फायदा घेऊन हॅकर्स फसवणूक करत आहेत. अनेकांना विंडोजची नवीन ऑपरेटिंग सिस्टम अजून उपलब्ध झाली नाही हे माहित नाही.
नवीन विंडोज म्हणजे Windows 11 सध्या फक्त विंडोज इनसाइडर प्रोग्राम मेंबर्स, डेवलपर्स आणि बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध आहे. सर्व पात्र पीसी युजर्स ऑक्टोबरपासून नवीन ऑपरेटिंग सिस्टम अधिकृतपणे डाउनलोड करू शकतात. रिपोर्ट्सनुसार, विंडोज 11 अल्फा एक माइक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्यूमेंटचा वापर करतो. या डॉक्युमेंटमध्ये असा दावा केला गेला आहे कि, हे डॉक्युमेंट Windows 11 Alpha च्या माध्यमातून बनवण्यात आले आहे. या डॉक्यूमेंटमध्ये काही स्टेप्स दिल्या जातात आणि त्या फॉलो करण्यासाठी सांगण्यात येते.
एखाद्या युजरने या स्टेप्स फॉलो केल्या तर एक कोड अॅक्टिव्हेट होतो, या कोडच्या माध्यमातून युजरची बँकिंग संबंधित माहिती चोरली जाते. विंडोजसंबंधित या मालवेयरची माहिती सर्वात आधी Anomali Security रिसर्चर्सनी दिली आहे. या रिसर्चर्सनी या मालवेयरवरील उपाय देखील शोधून काढला आहे. या मालवेयर मागे FIN7 नावाचा सायबर ग्रुप असल्याचे देखील संशोधनातून समोर आले आहे.
हे धोकादायक डॉक्युमेंट पसरवण्यासाठी कोणत्या माध्यमाचा वापर हॅकर्स करत आहेत, हे मात्र अजून समजले नाही. Anomali नुसार ईमेल फिशिंगचा वापर करून Windows 11 Alpha लोकांपर्यंत पोहोचत आहे. Windows 11 Alpha चे डॉक्युमेंटमधील स्टेप्स फॉलो करताच लोक हॅकर्सच्या जाळ्यात अडकतात. परंतु मायक्रोसॉफ्टने Windows 11 Alpha सारखे कोणतीही ऑपरेटिंग सिस्टम सादर केलेली नाही.