आपण एखादा फोटो काढतो आणि तो सोशलमिडीयावर शेअरही करतो. मात्र, तुम्हाला माहित आहे का, त्या फोटोसोबत तुमची माहितीही सोशल मिडीयावर जात असते. Exchangeable Image Format म्हणजेच EXIF, हा याचा मूळ स्त्रोत आहे. आजकाल सर्वच मोबाईल किंवा कॅमेऱ्यांद्वारे घेतलेल्या फोटोंमागे हा फोटो केव्हा घेतला, कुठे घेतला, शटरस्पीड, आयएसओ, अॅपार्चर आदींची माहिती सेव्ह होत असते. यामुळे बऱ्याचदा आपली खासगी माहितीही सर्वांना समजू शकते.
नुकतेच अभिनेत्री अनुष्का शर्माने गुगलच्या पिक्सल 2 च्या कॅमेऱ्याद्वारे घेतलेले फोटो सोशलमिडीयावर टाकले होते. मात्र, त्यावेळी ते आयफोनवरून टाकल्याचे दिसत होते. तसेच त्याचा डेटाही आयफोनच्या कॅमेऱ्याशी मिळताजुळता होता. यामुळे अनुष्का शर्मा ट्रोल झाली होती. अर्थात ट्रोल करणारे भारतीय नसले तरीही तिला तो फोटो डिलीट करावा लागला होता. अनुष्का गुगलच्या पिक्सल फोनची भारतातील ब्रँड अँम्बॅसिडर आहे.
फेसबुक, ट्विटर, इंन्स्टाग्राम सारख्या कंपन्या आपण फोटो अपलोड करतो तेव्हा त्यातील माहीती काढून टाकतात. मात्र, जीमेल किंवा इतर माध्यमाद्वारे फोटो शेअर केल्यास तुमच्या घराचा पत्ताही या फोटोतून कळू शकतो. चला तर मग असे फोटो शेअर करण्याआधी थोडी काळजी घेऊया...
EXIF ची माहिती कशी घालवायची...प्रथम गुगल फोटोचे अॅप डाऊनलोड करावे. त्यानंतर तुम्हाला ज्या फोटोची माहिती काढून टाकायची आहे तो फोटो अॅपमध्ये ओपन करावा. त्यानंतर फोटोवरील i हा आयकॉन दिसतो त्यावर क्लिक करावे. यानंतर तुम्हाला EXIF ची माहिती दिसेल. ही माहिती डिलीट करण्य़ासाठी तुम्हाला EXIF Eraser अॅप मदत करेल. या अॅपमध्ये जाऊन ती इमेज ओपन करावी. त्यानंतर इरेझ EXIF असा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर सर्व माहिती डिलीट झालेली असेल.