ब्लॅकबेरी कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी दोन नवीन स्मार्टफोन्स लाँच केले असून याला अॅमेझॉन इंडिया या शॉपिंग पोर्टलवरून उपलब्ध करण्यात येणार आहे. ब्लॅकबेरी कंपनीने अलिकडेच भारतीय बाजारपेठेत ब्लॅकबेरी की-२ हे मॉडेल लाँच केले होते. यानंतर आता ब्लॅकबेरी इव्हॉल्व्ह आणि इव्हॉल्व्ह एक्स हे दोन स्मार्टफोन्स उपलब्ध करण्यात आले आहेत. यांचे मूल्य अनुक्रमे २४,९९० आणि ३४,९९० रूपये असून ग्राहकांना याला अॅमेझॉन इंडिया या शॉपिंग पोर्टलवरून खरेदी करता येणार आहे.
ब्लॅकबेरी इव्हॉल्व्ह आणि इव्हॉल्व्ह एक्स या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये ब्लॅकबेरीची खासियत असणारा क्वार्टी कि-पॅड दिलेला नाही. याऐवजी यात टचस्क्रीन डिस्प्ले दिलेला आहे. यातील इव्हॉल्व्ह या मॉडेलमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ४५० हा प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते वाढविण्याची सुविधा आहे. यातील डिस्प्ले हा ५.९९ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस म्हणजे २१६० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा आहे. याच्या मागील बाजूस १३ मेगापिक्सल्स क्षमतांचे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. तर यातील फ्रंट कॅमेरा १६ मेगापिक्सल्स क्षमतेचा आहे.
ब्लॅकबेरी इव्हॉल्व्ह एक्स या मॉडेलमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ६६० हा अद्ययावत प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ६ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविता येणार आहे. याच्या मागील बाजूस १३ आणि १२ मेगापिक्सल्सचे दोन कॅमेरे दिले आहेत. यातील एक वाईड अँगल तर दुसरा टेलीफोटो या प्रकारातील असणार आहे. दोन्ही मॉडेल्समध्ये ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून ते अँड्रॉइडच्या ओरियो ८.१ या आवृत्तीवर चालणारे आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन्स ग्राहकांना नेमके केव्हा मिळणार याची माहिती कंपनीने दिलेली नाही. तथापि, ऑगस्ट महिन्याच्या उत्तरार्धात याला उपलब्ध करण्यात येईल असे मानले जात आहे.