नवी दिल्ली : रिलायन्स जिओची ब्रॉडबँड सेवा जिओ गिगाफायबर (JioGigaFiber) च्या रजिस्ट्रेशनसाठी गेल्या महिन्यापासून सुरुवात झाली आहे. रिलायन्स जिओची फायबर-टू-द-होम (FTTH)ही सेवा मार्केटमध्ये धूमाकूळ घालण्याची शक्यता आहे. दरम्यान, जिओला टक्कर देण्यासाठी इतर कंपन्यानी सुद्धा कंबर कसली आहे. बीएसएनएल कंपनीने आपल्या ब्रॉडबँड सेवेसाठी चार नवीन प्लॅन मार्केटमध्ये लॉन्च केले आहेत. यामध्ये कंपनीने 99 रुपये, 199 रुपये, 299 रुपये आणि 399 रुपयांच्या नवीन प्लॅनची घोषणा केली आहे.
कंपनीच्या या प्लॅनच्या माध्यमातून ग्राहकांना 20 एमबीपीएस स्पीड इतका डेटा मिळणार आहे. मर्यादा संपल्यानंतर हा स्पीड एक एमबीपीएस होईल. तसेच, या प्लॅनमध्ये फ्री कॉलिंगची सुविधा देण्यात येत आहे. विशेष, म्हणजे अंदमान आणि निकोबार सोडून देशभरातील ग्राहक या प्लॅनचा फायदा घेऊ शकणार आहेत. 99 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना प्रतिदिन 20 एमबीपीएसच्या स्पीडने 1.5 जीबी डेटा मिळणार आहे. डेटा मर्यादा संपल्यानंतर स्पीड 1 एमबीपीएस होणार आहे.
बीएसएनएलच्या 199 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना रोज 5 जीबी हायस्पीड डेटा मिळणार आहे. याची मर्यादा 30 दिवसांची आहे, म्हणजेच ग्राहकांना 30 दिवसांत एकूण 150 जीबी डेटा मिळू शकतो. 299 रुपयांच्या प्लॅनमध्ये एकूण 300 जीबी (10 जीबी प्रतिदिन) आणि 399 रुपयांमध्ये 600 जीबी (20 जीबी प्रतिदिन) डेटा मिळणार आहे. या प्लॅनचा फायदा घ्यायचा असेल, तर ग्राहकांनी या ऑफरची घोषणा झाल्यानंतर 90 दिवसांच्या आत प्लॅन अॅक्टिव्ह केला पाहिजे.
मोबाइल इंटरनेट सेवा क्षेत्रातील धमाक्यानंतर रिलायन्सने आता ब्रॉडबँड सेवा क्षेत्रात पाऊल टाकले आहे. रिलायन्स जिओ आता गिगाफायबर (JioGigaFiber) सर्व्हिस देणार आहे. गिगाफायबरच्या रजिस्ट्रेशनसाठी आजपासून सुरुवात झाली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, गिगाफायबर सर्व्हिसच्या माध्यमातून ग्राहकाला 1Gbps चा इंटरनेट स्पीड मिळणार आहे. सध्या गिगाफायबर सर्व्हिससाठी ग्राहकांना रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. तसेच, ज्या शहरातून सर्वाधिक जास्त रजिस्ट्रेशन होईल, त्या शहराला पहिल्यांदा गिगाफायबर कनेक्शन देण्यात येणार आहे. देशातल्या 1,100 शहरांपर्यंत जिओ गिगाफायबरचे जाळे पसरवण्याचा कंपनीने दावा केला आहे.