नवी दिल्ली - सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनलकडून देशातील पहिली इंटरनेट टेलिफोन सुविधा सुरु होणार असल्याची घोषणा आज करण्यात आली. बीएसएनएल युजर्संना 'विंग्ज' मोबाईल अॅपद्वारे देशातील कुठल्याही टेलिफोन नंबरवर कॉल करता येणार आहे. मात्र, यासाठी सबस्क्राईबरला 1099 रुपयांचे वार्षिक शुल्क द्यावे लागणार आहे. त्यानंतरच बीएसएनल किंवा इतर कुठल्याही कंपनीच्या वाय-फाय कनेक्शनद्वारे ते देशभरात अलिमिटेड टेलिफोन कॉल करु शकतील.
मोबाईल अॅपद्वारे कॉलिंगची सुविधा सध्या ठराविकच अॅपद्वारे देण्यात येत आहे. मात्र, आता बीएसएनच्या या अॅपद्वारे कुठल्याही फोनवर कॉल करता येणार आहे. दूरसंचारमंत्री मनोज सिन्हा यांनी या सेवेचे उद्घाटन केले. इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी मी बीएसएनलच्या सर्वच व्यवस्थापकांचे आभार मानतो. या सेवेद्वारे ग्राहकांना विना सीमकार्डद्वारे कॉल करता येणार आहे, असे सिन्हा यांनी म्हटले. तर, यासाठी एक ते दोन दिवसात नोंदणीप्रकिया सुरू होणार असून ही सुविधा 25 जुलैपासून ग्राहकांना वापरता येणार असल्याचे कंपनीचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक अनुपम श्रीवास्तव यांनी सांगितले. विंग्ज अॅपचा वापर करुन या सेवेद्वारे जगभरातील लोक भारतात कोठेही आणि कधीही मोफत कॉलिंग करु शकणार आहेत. या सेवेमुळे सद्यस्थितीत लँडलाईनचा उपयोग करणाऱ्या ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे.