भारत संचार निगम लिमिटेल अर्थात BSNL ने भारतात पहली "Satellite-to-Device" सर्व्हिस सुरू केली आहे. या मुळे देशातील अतिदुर्गम भागातही कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. दूरसंचार विभागाने (DoT) बुधवारी यासंदर्भात घोषणा केली. तसेच, ही सेवा अमेरिकन कंपनी Viasat च्या सहकार्याने सुरू करण्यात आली असून या नवीन तंत्रज्ञानाचा उद्देश, ज्या भागांत सामान्य मोबाइल नेटवर्क पोहोचत नाही तेथे कनेक्टिव्हिटी पोहोचवणे आहे, असेही सांगितले.
बीएसएनएलची कमाल -आजही भारताच्या अनेक भागांत Jio, Airtel, Vodafone-Idea सारख्या कोणत्याही टेलिकॉम कंपनीचे नेटवर्क पोहोचलेले नाही. ज्यामुळे तेथील लोकांना टेलिकॉम कनेक्शनचा लाभ घेता येत नाही. यापासून ते वंचित राहतात. असे साधारणपणे डोंगराळ आणि जंगली भागात घडते. लोकांच्या या समस्येवर मात करण्यासाठी, BSNL ने भारतात प्रथमच सॅटेलाइट-टू-डिव्हाइस सेवा सुरू केली आहे. याच्या सहाय्याने लोक फोन नेटवर्कशिवायही टेलिकॉम कनेक्टिव्हिटीचा वापर करू शकतील.
महत्वाचे म्हणजे, "सॅटेलाइट-टू-डिव्हाइस" सेवेची चाचणी पूर्ण झाली आहे आणि ती विविध आव्हानात्मक भागांतही स्थिर कनेक्शन प्रदान करण्यास सक्षम आहे, असे बीएसएनएलने म्हटले आहे. तसेच, दूरसंचार विभागाने (DoT) 'X' वर पोस्ट करत यासंदर्भात घोषणा केली आहे. "BSNL चे हे नवे पाऊल भारतात सॅटेलाइट कम्युनिकेशन सर्वसामान्य जनतेसाठी सोपे आणि सुलभ बनवेल."
UPI पेमेंटही करू शकतील लोक - BSNL चे हे सॅटेलाइट नेटवर्क युजर्सना इमरजन्सी कॉल्स, SOS मॅसेज, एवढेच नाही तर UPI पेमेंट्ससाठीही मदद करेल. मात्र, ही सुविधा सामान्य कॉल्स आणि SMS साठी उपलब्ध असेली की नाही? हे कंपनीने स्पष्ट केलेले नाही. याशिवाय, ग्राहक या सर्व्हिसचा लाभ कशा पद्धतीने घेऊ शकतील, हे देखील BSNL ने अद्यापपर्यंत सांगितलेले नाही.