गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तीन दिवसांत असेच दोन स्कॅम समोर आले आहेत. तामिळनाडूतून एका व्यावसायिकाला 18 लाखांचा गंडा घातल्याचे एक नवीन प्रकरण समोर आले आहे. या स्कॅमर्सनी व्यावसायिकाची फसवणूक करण्यासाठी कस्टम ऑफिसर असल्याचे भासवून लाखो रुपयांची फसवणूक केली. यापूर्वी एका महिलेला 19 लाखांचा गंडा घातला होता.
तीन दिवसांत असाच एक घोटाळा करून 37 लाखांचा स्कॅम झाल्याची घटना घडली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. सायबर विंगला दिलेल्या तक्रारीत व्यक्तीने सांगितले की, मला एक फोन आला ज्यामध्ये कॉलरने स्वतःची ओळख कस्टम अधिकारी म्हणून केली. त्याने सांगितले की, एक पार्सल मिळालं आहे, ज्यामध्ये कोकेन जप्त करण्यात आले आहे. ते तैवानमधून त्याच्या नावावर पाठवण्यात आले असून, त्यात आधार कार्डची प्रत आहे.
'असा' घातला गंडा
स्वत:ला कस्टम अधिकारी म्हणून सांगणाऱ्या व्यक्तीने यानंतर सांगितले की, तो या प्रकरणातून त्या व्यक्तीला वाचवू शकतो. त्याऐवजी, त्याने सुरुवातीला 98,000 रुपये मागितले, जे त्याने परत करण्याचे आश्वासन दिले. स्कॅमरने सांगितले की, कोणीतरी त्याच्या आधार कार्डचा गैरवापर केला आहे. यानंतर गुन्हा दाखल झाल्याचे सांगण्यात आले. यानंतर, कॉल डायव्हर्ट करून, त्याने व्यक्तीला पटवून दिले की पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
स्क्रीनशॉट पाठवून मागितले पैसे
काही स्क्रीनशॉट पाठवण्यात आले, ज्यामध्ये श्रीधरच्या नावाचा उल्लेख होता. त्याच्यावर मनी लाँड्रिंगचे तीन गुन्हे दाखल आहेत. ते गुन्हे मागे घेण्याच्या बदल्यात त्याच्याकडून आणखी पैशांची मागणी करण्यात आली. यानंतर त्याने 18 लाख रुपये ट्रान्सफर केले आणि स्कॅमर्सनी कॉल डिस्कनेक्ट केला. काही वेळाने त्याला कळले की हा स्कॅम आहे. त्यानंतर त्याने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. यापूर्वी चेन्नई येथील एका महिलेला सायबर गुन्हेगाराचा कॉल आला होता, ज्यामध्ये त्याने स्वत:ला कस्टम अधिकारी सांगून महिलेला 19 लाख रुपयांचा गंडा घातला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.