स्कॅमर्स सर्वसामान्य लोकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन पद्धतीचा वापर करत आहेत. आता गुरुग्राममधील पोलिसांनी अशाच एका कॉल सेंटरचा पर्दाफाश केला असून काही लोकांना अटकही केली आहे. लोकांची फसवणूक करण्यासाठी ते वेगवेगळ्या पद्धती वापरत होते. यामध्ये ते नामांकित कंपन्यांचे नाव वापरून टेक्नीकल सपोर्टच्या नावाखाली पॉपअप पाठवत असत. यानंतर ते एखाद्या व्यक्तीकडून 83 हजार रुपयांपर्यंत लुटायचे.
गुरुग्राममध्ये भाड्याच्या घरात सुरू असलेल्या कॉल सेंटरमधून पोलिसांनी काही लोकांना अटक केली आहे. तसेच तेथून नऊ लॅपटॉप, दोन टॅबलेट आणि एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे. हे लोक सर्वसामान्यांची फसवणूक करण्यासाठी एक अनोखी पद्धत वापरत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी एका प्रसिद्ध कंपनीचं नाव वापरून मोठ्या प्रमाणात व्हॉईस मेल आणि मेसेज पाठवायचे. येथून ते परदेशी लोकांना फसवायचे.
टेक्निकल सपोर्टच्या नावाखाली ते पॉपअपद्वारे मेसेज पाठवायचे. या जाळ्यात अनेक जण अडकत असत. आरोपी विदेशी लोकांचा कॉम्प्युटर आणि लॅपटॉपचा रिमोट एक्सेस घेत असत. यासाठी ते Anydesk, Team Viewer, Ultra Viewer असे एप्लिकेशन्स गुपचूप इन्स्टॉल करायचे. त्यानंतर युजर्सना मदत करण्याच्या नावाखाली स्कॅमर्च त्यांच्याकडून हजारो रुपये लुबाडायचे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी टेक्निकल सपोर्टच्या नावाखाली प्रति कस्टमर 500 ते 1000 डॉलर्सची फसवणूक करायचे. भारतीय चलनात ही किंमत 41 हजार ते 83 हजार रुपयांपर्यंत आहे. पोलिसांनी सांगितले की, हे लोक गिफ्ट कार्डच्या रूपात पैसे घेत असत. हे लोक गेल्या वर्षीपासून एका भाड्याच्या खोलीत कस्टमर केयर सेंटर चालवत होते.
पॉपअप स्कॅम्सपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी, कोणत्याही अनोळखी पॉपअपवर क्लिक न करणं महत्वाचं आहे. क्लिक केल्यानंतर, मालवेअर फाइल्स तुमचा फोन, टॅबलेट, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर इत्यादीमध्ये इन्स्टॉल केल्या जाऊ शकतात. यानंतर, रिमोट एक्सेसने ते आपल्या डिव्हाईसमध्ये एन्ट्री करतात. यामुळे तुमचं अकाऊंट खाली होऊ शकतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.