अँड्रॉइड युजर्सच्या प्रायव्हसीसाठी गुगल नेहमीच आपल्या पॉलिसीजमध्ये बदल करत असते. आता एक नवीन बदल अनके स्मार्टफोन युजर्सना नक्कीच अवनदार नाही. लवकरच अँड्रॉइडमधील कॉल रेकॉर्डिंग फिचर बंद होणार आहे. विशेष म्हणजे एक असं फिचर आहे जे अँड्रॉइड स्मार्टफोन्समध्ये मिळतं आणि महागड्या आयफोन्समध्ये मिळत नाही.
Google नं अलीकडेच आपल्या Play Store ची नियमावली अपडेट केली आहे, ज्यात अनेक बदल करण्यात आले आहेत. हे नवीन बदल 11 मेपासून लागू करण्यात येतील. त्यामुळे Play Store वरील कॉल रेकॉर्डिंग अॅप्लिकेशन्सवर मोठा परिणाम होईल. अँड्रॉइड फोन्सवर कॉल रेकॉर्डिंग करता येणार नाही परंतु काही स्मार्टफोन्सवर याचा परिणाम होणार नाही.
म्हणून बंद करणार कॉल रेकॉर्डिंग
Google च्या नवीन Play Store पॉलिसीनुसार, थर्ड पार्टी अॅप्सना कॉल रेकॉर्डिंगची परवानगी मागता येणार नाही. त्यामुळे ट्रू-कॉलर, ऑटोमॅटिक कॉल रेकॉर्डर, क्यूब एसीआर आणि अन्य अनेक लोकप्रिय अॅप बंद होऊ शकतात. परंतु ज्या Android फोनच्या डायलरमध्ये डिफॉल्ट कॉल रेकॉर्डिंग सुविधा आहे, त्या फोन्समधून कॉल रेकॉर्ड करता येतील.
प्री-लोडेड कॉल रेकॉर्डिंग अॅप किंवा फीचरसाठी अॅक्सेसिबिलिटीची परवानगी द्यावी लागत नाही. त्यामुळे अशा स्मार्टफोन्सवर नेटिव्ह कॉल रेकॉर्डिंग फिचर वापरता येईल, अशी माहिती गुगलनं दिली आहे. Google Pixel आणि Xiaomi फोन्समध्ये डायलर अॅप्सवर एक डिफॉल्ट कॉल रेकॉर्डर मिळतो. त्यामुळे जर तुमच्याकडे हे फोन्स असतील तर तुम्ही बिनदिक्कत कॉल रेकॉर्डिंग करू शकाल.