कॅनन इंडिया या कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी स्मार्टफोन्सला कनेक्ट करण्याची क्षमता असणारे मिनी पोर्टबल प्रोजेक्टर बाजारपेठेत दाखल करण्याची घोषणा केली आहे.
प्रोजेक्टरचा वापर सध्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे याचे नवनवीन मॉडेल्स बाजारपेठेत दाखल होत असून यात ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी नवनवीन फिचर्सचा समावेश करण्यात येत आहे. या अनुषंगाने कॅनन रायो मिनी पोर्टेबल प्रोजेक्टर हे मॉडेलदेखील अनेक उत्तमोत्तम फिचर्सने सज्ज आहे. यातील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे यामध्ये स्मार्टफोन व टॅबलेटचा सपोर्ट देण्यात आलेला आहे. अर्थात स्मार्टफोन आणि टॅबलेटवरील कंटेंट याच्या माध्यमातून प्रक्षेपित करण्याची सुविधा यात प्रदान करण्यात आली आहे. याला रायो आय५ आणि रायो आर४ या दोन व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आले असून यांचे मूल्य अनुक्रमे ३०,००० आणि ५०,००० रूपये इतके आहे.
रायोच्या या दोन्ही मॉडेल्समध्ये अनुक्रमे १९०० आणि १७०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी दिलेली आहे. ती एकदा चार्ज केल्यानंतर अनुक्रमे १२० आणि १५० मिनिटांपर्यंत चालत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. अर्थात विजेची सुविधा नसतांनाही याचा वापर करता येणार आहे. तात्काळ प्रेझेंटेशन्स तसेच स्मार्टफोनवरील कंटेंट मोठ्या पडद्यावर पाहण्याची सुविधा यात देण्यात आलेली असल्यामुळे बाजारपेठेत याला उत्तम प्रतिसाद मिळणार असल्याचा दावा कॅनन इंडिया कंपनीतर्फे करण्यात आला आहे.