नवी दिल्ली : डिजिटल व्यवहार करण्यासाठी जर तुम्ही सरकारने सुरु केलेले भीम अॅप वापरत असाल तर तुमच्यासाठी एक खूशखबर आहे. भीम अॅप वापरणा-यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त उद्यापासून (दि.14) कॅशबॅकची ऑफर मिळणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित करण्यात आलेल्या या भीम अॅपच्या माध्यमातून कॅशबॅकच्या अनेक योजनांचा फायदा ग्राहकांना होणार आहे. भीम अॅपच्या कॅशबॅक ऑफरमधून ग्राहकांना एका महिन्याला 750 रुपये आणि व्यावसायिकांना 1 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो. भारत सरकारच्या भीम(BHIM) म्हणजे Bharat Interface For Money अॅप नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया (NPCI) मार्फत चालविण्यात येते. ऑनलाइन पेमेंट अॅप म्हणून भीम अॅप भारतातले सर्वात प्रसिद्ध अँड्रॉईड अॅप ठरले आहे. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'डिजिधन मेला'मध्ये भीम हे आधार संलग्न मोबाईल पेमेंट अॅप लाँच केले होते. लाँचिंगच्या तीनच दिवसात भारतात गुगल प्ले स्टोअरवर हे अॅप अव्वल ठरले होते.
भीम अॅप कसे वापरायचे?• भीम अॅप BHIM अँड्रॉईड यूझर्सनी प्ले स्टोअरवरुन /आयओएस यूझर्सनी अॅपल स्टोअरवरुन डाऊनलोड करावे.• त्यानंतर तुमचं बँक खातं आणि त्यासोबत यूपीआय पिन तयार करा. (हा पर्याय अप डाऊनलोड करतानाचा विचारला जातो)• तुमचा मोबाईल नंबर हाच तुमचा पेमेंट अड्रेस असेल.• मोबाईल क्रमांक नोंदवल्यानंतर भीम अॅपचा वापर करता येईल.• इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषांचा पर्याय या अॅपमध्ये सध्या उपलब्ध आहे.• भीम अॅपद्वारे यूझर्स पैसे पाठवू शकतात, किंवा इतरांकडून मोबाईल नंबरवर घेऊही शकतात.• एमएमआयडी किंवा आयएफएससी कोडच्या माध्यमातून नॉन-यूपीआय बँकेच्या ग्राहकांनाही पैसे पाठवता येऊ शकतात.• यासाठी अॅपमध्ये इंग्रजी भाषेत सेंड किंवा रिसीव्ह मनी असा पर्याय देण्यात आला आहे.