वाहतूक कोंडीने पूर्ण जग त्रासला आहे. यामुळे यातून दिलासा मिळविण्यासाठी हवाई टॅक्सीची संकल्पना दोन वर्षांपूर्वी मांडण्यात आली होती. ही संकल्पना 2019 मध्ये प्रत्यक्षात येणार आहे. बेल या कंपनीने सीईएसमध्ये 150 मैल जाऊ शकणारी हायब्रिड एअर टॅक्सी दाखविली.
नेक्सस असे या एअर टॅक्सीचे नाव असून ती 6 हजार पाऊंडला मिळणार आहे. ही एअर टॅक्सी 150 मैल प्रती तास वेगाने जाऊ शकते. सध्यातरी ही टॅक्सी महाग असली तरीही वाहतूक कोंडी टाळून वेळेत पोहोचण्यासाठी उद्योजक, राजकीय नेते, अधिकाऱ्यांसाठी फायद्याची ठरणार आहे. गेल्या वर्षी बेल या कंपनीने या टॅक्सीचे प्रारुप दाखविले होते.
या नेक्सस टॅक्सीला सहा फॅन जोडण्यात आले आहेत. यामध्ये हायब्रिड इलेक्ट्रीक प्रणाली वापरण्यात आली आहे. तसेच टॅक्सीला पंख देण्यात आले असून ते पुढे वेगाने जाण्यासाठी आहेत. महत्वाचे म्हणजे ही टॅक्सी वरच्या बाजुला सरऴ रेषेत उड्डाण करू शकते. यामुळे तिला वेग घेण्यासाठी उड्डाणावेळी जास्त जागा लागत नाही. हे तंत्रज्ञान अमेरिकेच्या लढाऊ विमानांमध्ये वापरण्यात आले आहे.
अंतर्गत प्रणालीमध्ये स्क्रीन खिडकीवरच वापरण्यात आल्या आहेत. ज्यावर फ्लाईटची माहिती चालविणारा आणि पॅसेंजर गॉगलद्वारे पाहू शकणार आहे. या कंपनीने अमेरिकन सैन्यासाठी आणि नागरी वापरासाठी हेलिकॉप्टर बनविली आहेत. उभ्या रेषेमध्ये उड्डाण, उतरण्यासाठीची प्रणाली बनविण्यासाठी ही कंपनी माहीर आहे. यामुळे एअर टॅक्सीसाठी ही कंपनी स्टार्ट अप सारखी असली तरीही अनुभवामध्ये तगडी आहे.
या टॅक्सीमध्ये पायलटशिवाय चार प्रवासी बसू शकतात. सहा फॅन बॅटरीमधून वीज न घेता टर्बोइंजिनावर चालणार आहेत. तसेच ही टॅक्सी अकुशल पायलटही उडवू शकतो. यासाठी कुशल पायलटची गरज राहणार नाही.