रिचर्ड यू यांनी ‘ब्लूमबर्ग’ला दिलेल्या सविस्तर मुलाखतीत आगामी हुआवे मेट १० या मॉडेलबाबत बराच उहापोह केला आहे. यामध्ये त्यांनी हुआवे मेट १० या मॉडेलमध्ये फुल स्क्रीन डिस्प्ले असेल असा सांगितले. अलीकडच्या कालखंडात काही फ्लॅगशीप मॉडेलमध्ये (उदा. सॅमसंग गॅलेक्सी एस ८, एलजी जी ६ आदी) फुल स्क्रीन म्हणजे अगदी कडांवरदेखील डिस्प्ले दिलेला असतो. या पार्श्वभूमिवर हुआवे मेट १० मध्येही याच स्वरूपाचा अद्ययावत डिस्प्ले असेल असे स्पष्ट झाले आहे. हे मॉडेल फॅब्लेट या प्रकारातील असून अर्थातच यातील डिस्प्ले हा आकारमानाने मोठा असेल. तसेच यात उत्तम दर्जाची व जलद गतीने चार्ज होणारी बॅटरी तसेच उत्तम दर्जाचे फ्रंट व रिअर कॅमेरे असतील असेही यू यांनी स्पष्ट केले आहे. मात्र त्यांनी या स्मार्टफोनमध्ये कोणता प्रोसेसर असेल? याची माहिती दिली नाही. दरम्यान, आगामी कालखंडात आयफोन ८ सह सॅमसंग गॅलेक्सी एस ९ तर मायक्रोसॉफ्टचा सरफेस फोन हे तीन फ्लॅगशीप मॉडेल्स लाँच होणार आहेत. हे तिन्ही मॉडेल्स अनुक्रमे आयओएस, अँड्रॉइड आणि विंडोज या तीन प्रणालींवर चालणारे असतील. रिचर्ड यू यांनी थेट आयफोनशी टक्कर घेण्याचा दावा केल्या असल्याने आपोआपच दोन अन्य मॉडेल्सशीदेखील हुआवे मेट १० स्पर्धा करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हुआवे मेट १० या मॉडेलमध्ये व्हाईस कमांडवर चालणारा डिजीटल असिस्टंट देण्यात येणार आहे. सप्टेंबर महिन्यात आयफोन ८ लाँच होण्याची शक्यता असून याच्या कालखंडाच्या आसपास हे मॉडेल येईल असे संकेतदेखील रिचर्ड यू यांनी आपल्या मुलाखतीत दिले आहेत. हुआवे ही जगातील तिसर्या क्रमांकाची स्मार्टफोन उत्पादक कंपनी आहे. २०१७ मध्ये आपल्या कंपनीने १५ कोटी स्मार्टफोन विकण्याचे टार्गेट ठेवले असल्याचेही यू यांनी सांगितले. हुआवे कंपनी आजवर एंट्री लेव्हलसह मीड रेंज स्मार्टफोनवर भर देत असल्याचे आजवर दिसून आले आहे. तथापि, हुआवे मेट १० या मॉडेलच्या माध्यमातून कंपनी फ्लॅगशीप सेगमेंटमध्ये प्रवेश करत असल्याचेही यातून स्पष्ट झाले आहे.