बऱ्याच जणांना फिरण्याची भारी हौस असते. भारतात तर युवापिढीने कॅमेरा बनविणाऱ्या कंपन्यांना अक्षरश: डोक्यावर घेतले आहे. तसेच सध्या बाजारात चांगल्या प्रतीचे फोटो खेचणारे स्मार्टफोनही उपलब्ध आहेत. यामुळे आपल्या आजुबाजुला दिसणाऱ्या सुंदर गोष्टी टिपण्याचा छंद अनेकांना जडला आहे. या छंदातून अर्थार्जनही करता येऊ शकते. पाहा कसे ते...
वर्ल्ड फोटोग्राफी ऑर्गनायझेशनने सोनी वर्ल्ड फोटोग्राफी अॅवॉर्ड्सचे आयोजन केले आहे. या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी विविध गटही आहेत. विद्यार्थ्यांपासून तरुण, प्रोफेशनलसाठीही हे गट ठेवण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांसाठीची अंतिम तारिख उलटून गेली असली तरीही खुला आणि तरुण गटासाठी 4 जानेवारी आणि प्रोफेशनलसाठी 11 जानेवारी ही अंतिम तारिख आहे.
यंदाची ही 12 वी स्पर्धा आहे. आर्किटेक्चर, डॉक्युमेंट्री, लँडस्केप, पोर्ट्रेट, स्पोर्ट्स, स्ट्रीट फोटोग्राफी, वाइल्डलाइफ, ट्रॅव्हल, कल्चरसारख्या श्रेत्रामध्ये फोटो पाठवता येणार आहेत. महत्वाचे म्हणजे प्रवेश मोफत आहे. मात्र, प्रत्येक गटासाठी वयाची अट आणि काही शर्ती ठेवण्यात आल्या आहेत. विजेता ब्रिटनमध्ये तज्ज्ञांकडून निवडला जाणार आहे. जिंकणाऱ्याला 30 हजार डॉलर म्हणजेच 21 लाख रुपये बक्षिस दिले जाणार आहे. तर सोनी तर्फे अद्ययावत डिजिटल इमेजिंग उपकरणेही देण्यात येणार आहेत.
या स्पर्धेत भाग घेण्यासाठी www.worldphoto.org या वेबसाईटवर जावे लागणार आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर सर्व माहिती भरून फोटो अपलोड करावा लागणार आहे.