नवी दिल्ली-
ज्या दिवसापासून ChatGPT लॉन्च झालं आहे त्याची जगभर चर्चा होत आहे. अनेकांनी तर चॅट जीपीटी म्हणजे गुगलचा अंत असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी येत्या काळात हे चॅटबॉट नोकऱ्यांवर गदा आणेल असाही दावा केला गेला. आता तंत्रज्ञानाचे जसे फायदे असतात तसा याचा गैरफायदा घेणारेही अनेक असतात. त्याचीच आता सुरुवात होताना दिसत आहे.
चॅटजीपीटीचा गैरवापर केला जात असल्यामुळे ते आता न्यूयॉर्कमध्ये ब्लॉक करण्यात आलं आहे. न्यूयॉर्क सिटीच्या डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशननं ChatGPT चा अॅक्सेस ब्लॉक करुन टाकला आहे. त्याचं झालं असं की विद्यार्थी या चॅटबॉटचा गैरवापर करु लागलेत.
तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर अगदी क्षणार्धात हे चॅटबॉट देतं. यातून तुम्ही अगदी निबंध, लेख, संवाद, कविता अगदी बातमी देखील सहज प्राप्त करू शकता. विद्यार्थी आता होमवर्क करण्यासाठी या चॅटबॉटचा वापर करत आहेत. त्यामुळेच न्यूयॉर्कच्या शिक्षण विभागानं यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
सीएनईटीच्या रिपोर्टनुसार, शाळेचे प्रवक्ते जेना लाय यांनी दावा केला आहे की या चॅटबॉटमुळे विद्यार्थ्यांवर नकारात्मक परिणाम होत आहे. त्यामुळे याच्या वापराला बंदी घालावी लागत आहे. चॅट जीपीटीच्या माध्यमातून विद्यार्थी कोणतेही कष्ट न घेता गृहपाठ कॉपी करत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होईल. शालेय अभ्यासक्रमातच विद्यार्थ्यांमध्ये स्वत: विचार करुन कोणतेही काम करण्याची पद्धत विकसीत व्हायला हवी. पण या चॅटबॉटमुळे विद्यार्थी सर्व प्रश्नांची उत्तरं येथून फक्त कॉपी करत आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे.
न्यूयॉर्क हे ChatGPT ला ब्लॉक करणारं पहिलं शहर ठरलं आहे. येत्या काही दिवसात इतर ठिकाणीही याबाबतचा निर्णय घेतला जाऊ शकतो. न्यूयॉर्कमध्ये सध्या विद्यार्थी आणि शालेय स्टाफ फक्त त्याच डिव्हाइसवर ChatGPT वापरू शकतात जे शाळेच्या सिस्टमशी लिंक नाहीत.
काय आहे ChatGPT?ChatGPT हे एक आर्टिफिशल इंटेलिजन्स तंत्रज्ञानावर काम करणारं चॅटबॉट आहे. ज्यावर तुम्हाला फक्त एक क्लिक केलं की हव्या त्या प्रश्नाचं उत्तर, निबंध, लेख, कविता, संवाद असं सारंकाही लिहून मिळतं. अगदी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या चॅटबॉटवर सहज उपलब्ध होतं.