गेल्या काही दिवसांपासूनच बीएसएनएलदेखील एखाद्या कंपनीशी करार करून किफायतशीर हँडसेट लाँच करणार असल्याची चर्चा सुरू होते. यातच दिवाळीच्या पार्श्वभूमिवर, बीएसएनएलने मायक्रोमॅक्सच्या मदतीने भारत १ हा फिचरफोन ग्राहकांना सादर केला आहे. २० ऑक्टोबरपासून ग्राहकांना प्रत्यक्षात हा फिचरफोन खरेदी करता येणार आहे. या मॉडेलमध्ये २.४ इंच आकारमानाचा आणि क्युव्हिजीए क्षमतेचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन २०५ प्रोसेसर असेल. याची रॅम ५१२ मेगाबाईट आणि इनबिल्ट स्टोअरेज ४ जीबी असेल. यात २ मेगापिक्सल्सचा मुख्य तर सेल्फीसाठी व्हिजीए क्षमतेचा कॅमेरा देण्यात आला आहे. तर यातील बॅटरी २००० मिलीअँपिअर क्षमतेची असेल.
भारत १ फोर-जी फिचरफोन या मॉडेलमध्ये ड्युअल सीमकार्डचा सपोर्ट आहे. यात थ्री-जी आणि फोर-जी नेटवर्क कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यात आली आहे. या फिचरफोनमध्ये २२ भारतीय भाषांचा सपोर्ट देण्यात आलेला आहे. यामध्ये केंद्र सरकारचे भीम अॅप हे प्रिलोडेड अवस्थेत प्रदान करण्यात आले असून बीएसएनएल अॅपचा अॅक्ससदेखील असेल. यामध्ये लाईव्ह टिव्ही, म्युझिक, मुव्हीज आदींचा समावेश आहे.
भारत १ फोर-जी फिचरफोन या मॉडेलसोबत बीएसएनएलने ९७ रूपयांचा अमर्याद प्लॅन सादर केला आहे. यात एक महिन्यासाठी युजल अमर्याद कॉल्स करू शकणार आहे. याच्या सोबत त्याला अमर्याद डाटा आणि अमर्याद मोफत एसएमएसची सुविधादेखील देण्यात आली आहे. हा फिचरफोन जिओफोनला तगडे आव्हान देणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.