अलीकडच्या काळात बरेच स्मार्टफोन हे सेल्फी स्पेशल अर्थात उत्तम दर्जाच्या फ्रंट कॅमेर्याने युक्त असतात. तर काही मॉडेलमध्ये याच्याही पलीकडे जात ड्युअल कॅमेरा सेटअप दिलेला असतो. म्हणजेच यात ड्युअल फ्रंट कॅमेरे दिलेले असतात. मात्र सध्या तरी ही सुविधा फ्लॅगशीप मॉडेल्समध्ये असते. अलीकडे ओप्पो, विवो, लेनोव्हो आदी कंपन्यांनी 10 ते 15 हजार रूपये किंमतपट्टयातील काही मॉडेल्समध्ये हे फिचर दिलेले आहे. अर्थात सध्या तरी बहुतांश ड्युअल सेल्फी कॅमेरायुक्त स्मार्टफोनचे मूल्य 10 हजारांपेक्षा जास्त आहे. या पार्श्वभूमिवर, इंटेक्स टेक्नॉलॉजी या कंपनीने अवघ्या 6 हजार 999 रूपये मूल्यात ड्युअल सेल्फी कॅमेरायुक्त इएलवायटी ड्युअल हे मॉडेल लाँच करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
इंटेक्स इएलवायटी ड्युअल या मॉडेलमध्ये 8 आणि 2 मेगापिक्सल्स क्षमतांचे दोन फ्रंट कॅमेरे देण्यात आलेले आहेत. यातील एक कॅमेरा आरजीबी तर दुसरा मोनाक्रोम या प्रकारातील असेल. या दोघांच्या एकत्रीत इफेक्टमुळे अतिशय दर्जेदार अशा सेल्फी प्रतिमा काढता येणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. या फ्रंट कॅमेर्यांमध्ये बोके इफेक्टसह बॅकग्राऊंड चेंज इफेक्ट, 3डी ऑडिओ रिडक्शन, स्पाय कॅम, नाईट शॉटस्, फिल्टर्स व ऑडिओ पीक्स आदी फिचर्सचाही समावेश करण्यात आला आहे. या कॅमेर्यांच्या मदतीने अगदी डीएसएलआरच्या तोडीच्या प्रतिमा काढता येणार असल्याचा दावा इंटेक्स कंपनीने केला आहे. तर या स्मार्टफोनमधील मुख्य कॅमेरा हा एलईडी फ्लॅशयुक्त 8 मेगापिक्सल्सचा असेल. दोन्ही कॅमेर्यांमध्ये ऑटो-फोकस हे फिचर असेल.
उर्वरित फिचर्समध्ये इंटेक्स इएलवायटी ड्युअल हा स्मार्टफोन 5 इंच आकारमानाच्या आणि 1280 बाय 720 पिक्सल्स (एचडी) क्षमतेच्या 2.5 डी डिस्प्लेने सज्ज असेल. यात क्वॉड-कोअर स्प्रेडट्रम 9850 प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम 2 जीबी व स्टोअरेज 16 जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डने 128 जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. यातील बॅटरी 2400 मिलीअँपिअर क्षमतेची असून हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा असेल. हा स्मार्टफोन ब्लॅक आणि शँपेन या रंगांच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आला आहे.