China Taiwan Crisis: चीन आणि तैवानमधील तणावाचे पडसाद आता जागतिक बाजारपेठेवर पाहायला मिळत आहेत. दोन्ही देश स्मार्टफोन, लॅपटॉप आणि इलेक्ट्रॉनिक कंपन्यांसाठी महत्वपूर्ण आहेत. नुकतंच अमेरिकेच्या स्पीकर नेन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यामुळे चीनचा तीळपापड झाला आहे. तैवानची घेराबंदी करुन चीन फायर ड्रील करत आहे.
दोन्ही देशांमधील तणावामुळे कंपन्यांना व्यापारासंबंधी आता मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दिग्गज स्मार्टफोन कंपनी Apple नं आपल्या पुरवठादारांना चीनच्या नियमांचं पालन करण्याचे आदेश दिले आहेत. कंपनीनं तैवानहून चीनला जाणाऱ्या शिपमेंटसाठी चीनी नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जाईल याची काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. चीननं तैवानमध्ये उत्पादन केल्या जाणाऱ्या पार्ट्सवर कठोर निर्बंध लावण्यास सुरुवात केली असल्याचं अॅपल कंपनीनं म्हटलं आहे.
चीनच्या नियमांचं पालन करा- अॅपल कंपनीचा आदेशसुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अॅपलनं आपल्या सर्व पुरवठादारांना वॉर्निंग दिली आहे. तैवानहून चीनला जाणाऱ्या आपल्याशी निगडीत सर्व पार्ट्स आणि उत्पादनांवर एकतर 'तैवान-चीन' किंवा 'चीनी तैपेई' असा लेबल ठेवा, असं Apple कंपनीनं आपल्या पुरवठादारांना सांगितलं आहे. कंपनीनं तातडीनं याबाबतचं पालन करण्यास सांगितलं आहे. जेणेकरुन कंपनीनं आयात केलेल्या सामान आणि उत्पादनांची वर्गवारी करताना कोणतीही अडचणी येणार नाही.
iPhone 14 सीरिजची लॉन्चिंग रखडणार?पुढील महिन्यात कंपनी iPhone 14 सीरिज आणि इतर प्रोडक्ट लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. यातच चीन आणि तैवानमधील तणावाचा परिणाम पुरवठ्यावर होऊ शकतो. त्यामुळे कंपनीच्या आगामी उत्पादनांच्या लॉन्चिंगवरही याचा परिणाम पाहायला मिळू शकतो.
सुत्रांच्या माहितीनुसार इंपोर्टेड डिक्लेरेशन फॉर्म, डॉक्युमेंट किंवा बॉक्सवर Made In Taiwan लेबल असल्यास चीनच्या कस्टम विभागाकडून कठोर तपासणीला सामोरं जावं लागणार आहे. तसंच नियमांचं उल्लंघन झाल्यास ४ हजार युआन (जवळपास ४७ हजार रुपये) दंड आकारला जाऊ शकतो. तसंच शिपमेंट देखील रोखलं जाऊ शकतं.