नवी दिल्ली : ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांनी सुरू केलेल्या सेलला ग्राहकांचा त्याला तुफान प्रतिसाद मिळाला आहे. विशेष म्हणजे या सेलमधील चिनी कंपन्यांचे स्मार्टफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू काही मिनिटांतच जोरदार खरेदी करण्यात आल्या आहेत. नुकताच लाँच केलेला वनप्लस नॉर्ड स्मार्टफोन हा ६-७ ऑगस्ट या काळात झालेल्या अमेझॉन प्राईम डे सेलमध्ये सर्वाधिक विकला गेला असल्याचं ऍमेझॉननं सांगितलं. फ्लिपकार्टचा स्वातंत्र्य दिवस सेल हा ६-१० ऑगस्ट या काळात सुरू होता. ऍमेझॉन फ्रीडम सेल ८-११ ऑगस्ट या कालावधीसाठी आहे.भारत-चीनमध्ये लडाखमध्ये संघर्ष झाल्यानंतर चीनच्या वस्तूंवर भारतात बहिष्कार घालण्याची मोहीम राबवण्यात आली होती. पण या ऑनलाइन ऑफर्सवर भारतीय ग्राहक अक्षरशः तुटून पडले, आत्मनिर्भर भारताचा नाराही हवेतच विरला. भारतानं आत्मनिर्भरचा नारा दिल्यानं चीनच्या कंपन्यांची चिंता वाढली होती. तरीसुद्धा चीन स्मार्टफोनला भारतीय ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. दोन दिवसांच्या कालावधीच रिएल मी फोनच्या विक्रीत मोठी वाढ झाली. एकूण व्यापारी मूल्य हे ४०० कोटींच्या आसपास असण्याची शक्यता आहे, अशी माहिती realme indiaच्या प्रवक्त्यानं दिली आहे. कंपनीचा वायर्ड इयरफोन हे सर्वाधिक विकलं गेलेलं प्रोडक्ट ठरलं आहे, तर इतर वर्क फ्रॉम होमच्या प्रोडक्टलाही ग्राहकांची मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचं कंपनीनं सांगितलं आहे.काही ब्रँड्सचे प्रोडक्ट हे अवघ्या १५ सेकंदांत विकले गेले आणि ग्राहकांना ऑऊट ऑफ स्टॉकचा मेसेज दिसू लागला. दरम्यान, शाओमी, वनप्लस, ओप्पो आणि विवो यांनी प्रतिसाद मिळालेला नाही. टीसीएल इंडियाचे मॅनेजर माईक चेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या कंपनीचे 4K आणि QLED टीव्ही मॉडल फ्लिपकार्टवर अर्ध्या दिवसातच तुफान खरेदी केले गेले. गेल्या वर्षीच्या तुलनेत विचार करता यावर्षीच्या जूनमध्ये ४७ टक्के, तर जुलैमध्ये विक्रीत ४० टक्के वाढ झाली आहे. या वर्षातील पहिल्या ६ महिन्यांत टीसीएलच्या विक्रीत २० टक्क्यांची वाढ झाल्याचंही चेन यांनी सांगितलं.
कसं व्हायचं 'आत्मनिर्भर'?; चिनी स्मार्टफोनची सेलमध्ये काही मिनिटांत तुफान विक्री
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 12:20 PM