गेल्या काही दिवसांपासून चिनी स्मार्टफोन कंपन्या भारतीय तपास यंत्रणांच्या रडारवर आल्या आहेत. त्यात शाओमी, ऑपो आणि विवो यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांच्या स्मार्टफोन्सना भारतात चांगली मागणी आहे. त्यामुळे त्यांची बक्कळ कमाई होत आहे. मात्र, असे असले तरी या कंपन्यांनी करचोरी केल्याचे निदर्शनास आले आहे.
स्पर्धा आयोगाकडून चौकशी?
इन्कम टॅक्स आणि महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) यांनी गेल्या काही दिवसांत स्मार्टफोननिर्मात्या चिनी कंपन्यांच्या कार्यालयांवर छापे टाकले. या कंपन्यांवर करचोरी केल्याचा आरोप आहे. शाओमी, विवो आणि ऑपो या कंपन्यांच्या करचोरी प्रकरणाची चौकशी भारतीय स्पर्धा आयोगाकडून (सीसीआय) होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
करचोरी आणि अन्य कारणे
- उत्तम व्यवसाय आणि बाजारहिस्सा असतानाही या कंपन्यांनी प्रॉफिटॅबिलिटी रिपोर्ट केंद्राला सादर केला नाही.
- या कंपन्यांनी सतत तोट्याचा ताळेबंद सादर केल्याने इन्कम टॅक्स वाचविण्यासाठी त्यांचा हा कट असल्याचा सुगावा लागला.
- करचोरीबरोबरच केंद्र सरकार चिनी कॉम्पोनन्टस पुरवठादारांशी या कंपन्यांनी केलेल्या कराराचीही चौकशी करणार आहे.
- वितरण साखळीतही या कंपन्यांनी भारतीयांना चार हात लांब ठेवल्याचे निदर्शनास आल्याने त्याचीही चौकशी केली जाणार आहे.
वित्तीय अहवालातही गडबड
- शाओमी, ऑपो आणि विवो या कंपन्यांनी केंद्राला सादर केलेल्या वित्तीय अहवालांमध्येही अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत.
- या सर्व अहवालांची छाननी होऊन तपास यंत्रणा कंपन्यांचे ताळेबंद बारकाईने तपासत आहेत.
- तसेच उत्तम प्रकारे विक्री होऊनही या कंपन्यांनी तोट्याचा ताळेबंद कसा सादर केला, याचीही चौकशी केली जाणार आहे.