चीनी कंपन्यांचा परवडणाऱ्या दरातील सेगमेंटमध्ये दबदबा आहे. भारतीय बाजारात स्वस्त स्मार्टफोनसाठी ग्राहकांची मोठी क्रेझ आहे. पण चीनीस्मार्टफोन कंपन्यांमुळे स्थानिक स्मार्टफोन निर्मात्या कंपन्यांना मोठं नुकसान भोगावं लागत आहे. नुकतंच समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार भारत सरकार आता देशात १२ हजार रुपयांपर्यंतच्या चीनी स्मार्टफोनच्या विक्रीवर बंदी आणण्याची तयारी करत आहे.
चीनी स्मार्टफोन कंपन्या परवडणाऱ्या दरातील स्मार्टफोनच्या सेगमेंटमध्ये एन्ट्री केल्यामुळे Lava आणि Micromax सारख्या भारतीय स्मार्टफोन निर्मात्या कंपन्यांनी आपली हिस्सेदारी गमावली आहे. भारतीय स्मार्टफोन कंपन्यांना पाठिंबा देण्याची भूमिका सरकारची असली तरी यातून चीनला धक्का देण्याचा मनसुबा आखण्यात आला आहे. १२ हजार रुपयांच्या घरात येणाऱ्या सर्व चीनी स्मार्टफोनवर बंदी घालण्याची तयारी भारत सरकारनं केली आहे.
भारतात जर असं पाऊल उचललं गेलं तर यात शाओमीसह अनेक चीनी कंपन्यांना मोठा झटका बसणार आहे. या क्षणाला भारत सरकार या किंमतीच्या श्रेणीतील स्मार्टफोन लॉन्च करणार्या चीनी कंपन्यांना धक्का देण्याचे धोरण जाहीर करेल की अनौपचारिक माध्यमांद्वारे चीनी कंपन्यांना याची माहिती देईल याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही.
जूनच्या तिमाहीत १२ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीच्या स्मार्टफोनच्या विक्रीत चीनी कंपन्यांचा ८० टक्के वाटा आहे. २०२० पासून सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतातील चीनी कंपन्यांना व्यवसाय करणं कठीण होऊ लागलं आहे. सरकारनं हळूहळू चीनी मोबाइल अॅप्सवरही बंदी घातली आणि आता १२ हजारापेक्षा कमी किमतीच्या चीनी स्मार्टफोनवर बंदी घालण्याचा सरकारचा इरादा आहे.