कोमिओ मोबाईल्स या कंपनीने या महिन्याच्या प्रारंभीच १८ ऑगस्ट रोजी भारतीय बाजारपेठेत पदार्पण करण्याची घोषणा केली होती. यानुसार आज कोमिओ मोबाईल्स कंपनीने भारतात कोमिओ पी१, एस१ आणि सी१ हे तीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. कोमिओ पी १ या मॉडेलचे मूल्य ९,९९९; एस१चे ८,९९९ तर सी १ चे मूल्य ५९९९ रूपये असेल. अर्थात अन्य चीनी कंपन्यांप्रमाणे कोमिओनेही किफायतशीर दरातल्या स्मार्टफोनच्या सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे. पहिल्या टप्प्यात हे तिन्ही मॉडेल्स उत्तर भारतात मिळणार असले तरी काही दिवसात देशभरातील शॉपीजमधून ते ग्राहकांना उपलब्ध करण्यात येतील. या कंपनीने भारतात प्रवेश करतांना विक्री-पश्चात सेवा अर्थात ‘आफ्टर सेल सर्व्हीस’ला प्राधान्य दिले आहे. या अनुषंगाने कंपनीने तिन्ही मॉडेल्ससाठी एकदा स्क्रीन रिप्लेसमेंट वॉरंटी देण्याची घोषणा केली आहे.
काही फिचर कॉमन
कोमिओ मोबाईल्सच्या या तिन्ही स्मार्टफोनमध्ये ६४ बीट क्वाड-कोअर मीडियाटेक हा प्रोसेसर व ३२ जीबी इनबिल्ट स्टोअरेज तसेच फोर-जी व्हिओएलटी नेटवर्क सपोर्ट देण्यात आलेला आहे. यात फ्रिझर आणि क्लोन अॅप्लीकेशन्स या सुविधाही आहेत. यातील फ्रिझरच्या अंतर्गत स्टोअरेजची चिंता न बाळगता हवी तितकी अॅप्लीकेशन्स ‘फ्रिझ’ करता येतात. तर क्लोनींगच्या अंतर्गत सर्व डेटाचे बॅकअप घेतले जाते. या तिन्ही मॉडेल्समध्ये ‘अँटी थेप्ट’ प्रणाली प्रिलोडेड अवस्थेत देण्यात आली आहे.
कोमिओ पी १
या मॉडेलमध्ये तब्बल ५००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन मेटल ग्रे आणि सनशाईन गोल्ड या रंगांच्या पर्यायांमध्ये ग्राहकांना उपलब्ध करण्यात आला आहे. यातील ५.५ इंच आकारमानाचा डिस्प्ले हा एचडी क्षमतेचा असेल. तर याची रॅम तीन जीबी इतकी देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमधील मुख्य आणि फ्रंट कॅमेरे अनुक्रमे १३ व ८ मेगापिक्सल्स क्षमतांचे असतील.
कोमिओ एस १
या मॉडेलमध्ये मेटलची बॉडी देण्यात आली असून हा स्मार्टफोन रॉयल ब्लॅक आणि सनराईज गोल्ड या रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. यात ५.२ इंच आकारमानाचा आणि एचडी क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले असेल. या मॉडेलची रॅम दोन जीबी असून यात २७०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असेल. तर यातील कॅमेरे हे अनुक्रमे १३ व ८ मेगापिक्सल्स क्षमतांचे असतील.
कोमिओ सी १
या मॉडेलमध्ये स्टीरिओ स्पीकरचा सेटअप प्रदान करण्यात आला असून हाय-फाय म्युझिक हे खास फिचर देण्यात आले आहे यातही ‘अँटी थेप्ट’ प्रणाली दिलेली आहे. यात पाच इंची एचडी क्षमतेचा डिस्प्ले असून कॅमेरे अनुक्रमे ८ व ५ मेगापिक्सल्स क्षमतांचे देण्यात आले आहेत. मेलो गोल्ड आणि स्पेस ब्लॅक या रंगांच्या पर्यायांमध्ये हे मॉडेल ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.