नवी दिल्ली : चॅट जीपीटी आणि गुगल बार्ड यांसारख्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्लॅटफॉर्ममुळे कामकाज सोपे होत आहे. पैसे आणि वेळ वाचविण्यासाठीही हे प्लॅटफॉर्म उपयुक्त आहेत. तरीही चीन, रशिया आणि इराणसारख्या अनेक देशांतील बहुराष्ट्रीय कंपन्या त्यांच्या वापरावर प्रतिबंध घालत असून त्यांचा मर्यादित वापर करण्यास परवानगी देत आहेत.
‘एआय’वरील अवलंबित्व भविष्यात मनुष्य जातीसाठी जोखमीचे ठरू शकते. ‘एआय’मुळे खासगी माहिती आणि खासगी तांत्रिक वैशिष्ट्यांची चोरी होण्याची तसेच नोकऱ्या कमी होण्याचीही भीती आहे. एका मोठ्या कंपनीत माहिती चाेरीचा प्रकार घडला होता. त्यामुळे अनेक कंपन्यांनी नव्या तंत्रज्ञानावर प्रतिबंध घातला आहे, असे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले.
चीन, रशिया, इराण, उत्तर कोरिया, इटाली, सीरिया आणि क्यूबा यांसारख्या काही देशांनी चॅट जीपीटीवर बंदी घातली आहे. फेक न्यूज आणि चुकीची मते प्रसारित करण्यासाठी ‘एआय’चा वापर होऊ शकतो, अशी भीती या देशांना वाटते. ॲमेझॉन, ॲपल याशिवाय अमेरिकेतील अनेक बँकांनी एआयवर बंदी घातली आहे.
१२ हजार कर्मचाऱ्यांच्या एका सर्वेक्षणानुसार, ४२ टक्के सीईओंचे म्हणणे आहे की, आगामी १० वर्षांत एआय तंत्रज्ञान मानवाला शह देऊ शकते. ४३ टक्के कर्मचारी आपल्या बॉसला न सांगता चॅट जीपीटी आणि अन्य एआय प्लॅटफॉर्मचा वापर करतात.