बिजिंग : नुकताच लाँच झालेला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 5G प्रोसेसरचा पहिला फोन आणण्यास सॅमसंग, वनप्लस या कंपन्यांमध्ये स्पर्धा लागलेली असताना चीनच्याच प्रथितयश कंपनीने बाजी मारली आहे. लिनोव्होने क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 855 या नव्या प्रोसेसरचा फोन लाँच करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. भारतात 5G येण्यास अवकाश असला तरीही इतर देशांमध्ये 2019 च्या पहिल्या तिमाहीनंतर 5G येण्याची शक्यता आहे.
लिनोव्होने Z5 Pro GT हा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला आहे. या फोनमध्ये 6.39 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये नॉच देण्यात आलेला नाही. हा फोन स्लायडर डिझाईनचा आहे ज्यामध्ये पुढील कॅमेराला जागा दिलेली आहे. जसा पुढील कॅमेरा ऑन केला जाईल तसा स्लायडर बाहेर येणार आहे.
या फोनच्या पुढील बाजुला ड्युअल कॅमेरा देण्यात आला आहे. या कॅमेराचा प्रायमरी सेन्सर 16 मेगापिक्सलचा आहे. तर सेकंडरी सेन्सर 8 मेगापिक्सलचा आहे. तर पाठीमागील ड्युअल कॅमेरा 16 आणि 24 मेगापिक्सलचा आहे.
या फोनला वेगवेगळ्या व्हेरिअंटमध्ये उतरण्यात आले आहे. पहिल्या व्हेरिअंटमध्ये 6 जीबी आणि 128 जीबी स्टोरेज स्पेस आहे. याची किंमत चीनमध्ये 2698 युआन म्हणजेच 27700 रुपये आहे.
दुसरे व्हेरिअंट 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज स्पेसमध्ये आहे. ज्याची किंमत 30,800 रुपये आहे. आणि तिसऱ्या 8 जीबी, 256 जीबी स्टोरेज स्पेसच्या व्हेरिअंटची किंमत 41 हजार रुपये ठेवण्यात आली आहे.