सध्या गुगल आणि अमेझॉनमधील स्पर्धा टोकाला पोहचली असून यामुळे अमेझॉन इको शो आणि फायर टिव्हीवरून युट्युब अॅप हटविण्याची घोषणा केली आहे. टेक कंपन्यांमधील टोकाची स्पर्धा ही बाब तशी नवीन नाही. आजवरच्या इतिहासात याची साक्ष देणार्या अनेक घटना घडल्या असून वर्तमानातही या बाबी आढळून येतात. याचाच नवीन अध्याय गुगल आणि अमेझॉनच्या भांडणातून दिसून येत आहे. या दोन्ही कंपन्यांची अनेक प्रॉडक्ट एकसमान असल्यामुळे संघर्षाची ठिणगी पडली असून अलीकडच्या काळात याने तीव्र स्वरूप धारण केले आहे.
यात आता गुगलने आपल्या युट्युब या अॅपला अमेझॉन इको शो हा डिस्प्लेयुक्त स्मार्ट स्पीकर आणि फायर टीव्हीवरून हटविण्याचा निर्णय घेतला आहे. इको शो हे प्रॉडक्ट अलीकडेच सादर करण्यात आले होते. यावरून युट्युब हटविल्याचा फारसा फरक पडणारा नाही. तथापि, फायर टिव्हीच्या मदतीने स्मार्ट उपकरणे टिव्हीला जोडून पहाणार्यांची संख्या लक्षणीय असल्यामुळे याचे ग्राहक नाराज झाले आहेत. युट्युबच्या लोकप्रियतेला आव्हान देणारी व्हिडीओ सेवा सध्या तरी कोणतीही नसल्यामुळे अमेझॉन याला पर्यायदेखील शोधू शकत नाही. मात्र या प्रकारामुळे अमेझॉनच्या ग्राहकांना फटका बसला आहे.
अमेझॉन हे जगातील आघाडीचे शॉपिंग पोर्टल आहे. यावरून गुगल कंपनीचे क्रोमकास्ट तसेच गुगल होम आदींसारखे प्रॉडक्ट विकण्यास अमेझॉन टाळाटाळ करत आहे. कारण यांची अमेझॉनच्या उत्पादनांशी थेट स्पर्धा आहे. यामुळे गुगलने युट्युब हटविण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. गुगलने १ जानेवारीपासून युट्युब न दाखविण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या दोन्ही कंपन्यांमध्ये सलोख्यासाठी चर्चा सुरू असली तरी शेवटचे वृत्त हाती येईपर्यंत समेट झाला नव्हता.