फेसबुक म्हणजेच मेटाच्या सीओओ शेरील सँडबर्ग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. फेसबुकचे मालक मार्क झकरबर्ग यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे अधिकार असलेल्या अधिकाऱ्याने पद सोडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. महत्वाचे म्हणजे राजीनाम्याचे कारण सांगितलेले नाही.
झकरबर्गने शेरीलने कंपनी सोडल्यामुळे एका युगाचा अंत झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे, यावरून शेरील यांचा राजीनामा फेसबुकसाठी किती धक्कादायक आहे, याचा अंदाज येतो. असे असले तरी शेरील या मेटाच्या संचालक मंडळात राहणार आहेत. शेरील सँडबर्ग या गेल्या १४ वर्षांपासून फेसबुकशी जोडलेल्या होत्या. आता मेटाच्या सीओओ पदासाठी जेविअर ओलीवन यांचे नाव समोर आले आहे. झकरबर्ग यांनीच फेसबुकवर पोस्ट लिहून याची माहिती दिली आहे.
शेरील यांनी फेसबुकसाठी जे केले ते ओलीवन करू शकणार नाहीत. शेरील यांनी सीओओ पदाची वेगळी व्याख्या लिहिली. परंतू ओलीवन हे प्रोफेशनल पद्धतीने काम करतील. कारण शेरील ही चांगली आणि जवळची मैत्रिण होती असे झकरबर्ग म्हणाले. त्यांच्या कामाची पद्धत खूप मिस करेन, असेही झकरबर्ग म्हणाले.
१४ वर्षांपूर्वी मार्कने एका पार्टीमध्ये शेरीलला फेसबुकचे व्हिजन सांगितले होते. या पार्टी मिटिंगने शेरीलचे आयुष्य बदलले. तिने फेसबुक जॉईन केले आणि १४ वर्षांचा काळ कंपनीसाठी दिला. यावर शेरीलने आता मी माझ्या फाऊंडेशन आणि सामाजिक कामांकडे लक्ष देणार आहे, असे सांगितले.