कुलपॅड कूल प्ले ७ हा ड्युअल कॅमेर्यांनी सज्ज असणारा स्मार्टफोन आता बाजारपेठेत उपलब्ध होणार असून याचे नुकतेच अनावरण करण्यात आले. कुलपॅड कंपनीने गेल्या वर्षी कूल प्ले ६ हे मॉडेल बाजारपेठेत सादर केले असून याला ग्राहकांचा बर्यापैकी प्रतिसाद लाभला आहे. या पार्श्वभूमीवर याचीच पुढील आवृत्ती कूल प्ले ७ या मॉडेलच्या माध्यमातून आता बाजारपेठेत उतारण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात आधीच्या आवृत्तीपेक्षा अनेक नवीन फिचर्सचा समावेश करण्यात आला असून यातील सर्वात लक्षणीय बाब म्हणजे ड्युअल कॅमेर्यांचा समावेश होय.
या मॉडेलच्या मागील बाजूस प्रत्येकी १३ मेगापिक्सल्स क्षमतांचे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. यातील एक आरजीबी तर दुसरा मोनोक्रोम या प्रकारातील असणार आहे. यांच्या मदतीने अगदी सजीव वाटणार्या प्रतिमा घेता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. तर यातील फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सल्सचा असणार आहे. याच्याच मदतीने फेस अनलॉक फिचर वापरता येणार आहे. याच्या मागील बाजूस फिंगरप्रिंट स्कॅनर असून यामध्ये २८४० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आलेली आहे.
उर्वरित फिचर्सचा विचार केला असता, कुलपॅड कूल प्ले ७ या मॉडेलमध्ये ५.८५ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस (२२८० बाय १०८० पिक्सल्स) क्षमतेचा व १९:९ अस्पेक्ट रेशो असणारा डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये मीडियाटेकचा एमटी ६७५० हा प्रोसेसर असेल. याची रॅम ४ जीबी व इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. पहिल्यांदा हा स्मार्टफोन चीनी ग्राहकांना सादर करण्यात आला असला तरी लवकरच याला भारतातही लाँच करण्यात येईल असे मानले जात आहे.