नवी दिल्ली – जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भारतासह अनेक देशांनी लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. कोरोनामुळे जगभरात आतापर्यंत तब्बल 33, 976 लोकांचा मृत्यू झाला असून 7,22,088 लोकांना संसर्ग झाला आहे. तर 1,51,766 लोक बरे झाले आहेत. भारतात कोरोनामुळे आतापर्यंत 20 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 1000 हून अधिक झाली आहे. कोरोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे. कोरोनासारख्या जागतिक महामारीचा मुकाबला करण्यासाठी अनेक राजकीय नेते पुढे सरसावले आहेत. कोरोनाशी लढण्यासाठी गुगलने मदतीचा हात दिला आहे.
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी 800 मिलियन डॉलरपेक्षा जास्त म्हणजेच जवळपास 5 हजार 900 कोटींची मदत करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. लघू तसेच मध्यम उद्योग, आरोग्य संघटना तसेच प्रशासन आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी ही मदत जाहीर केली आहे. सुंदर पिचाई यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. 'गुगल अॅड क्रेडिटच्या रुपात 340 मिलियन डॉलर दिले जाईल. हे क्रेडिट मागील एक वर्षापासून सक्रिय खाते किंवा व्यवसाय असलेल्या लोकांना दिले जाईल' असं ट्विट पिचाई यांनी केलं आहे.
सुंदर पिचाई यांनी जागतिक आरोग्य संघटना आणि 100 पेक्षा अधिक शासकीय यंत्रणांसाठी सुमारे 1800 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. तसेच 150 कोटी रुपये सामुदायिक वित्तीय संस्था तसेच स्वयंसेवी संस्था, 2500 कोटी लघू तसेच मध्यम उद्योगांना उपलब्ध करण्याची घोषणा करण्यात आली आहे. सामाजिक संस्था आणि बँकांना 200 मिलियन डॉलर दिले जाईल. जेणेकरुन छोट्या व्यवसायांसाठी भांडवलाची व्यवस्था करता येईल असं ही त्यांनी म्हटलं आहे.
केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजेच सीआरपीएफने कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. देशाच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही केंद्रीय राखीव पोलीस दलाकडे असते. सीआरपीएफनेही आपले एकदिवसाचे वेतन कोरोनाग्रस्तांना मदत म्हणून दिले आहे. ‘कोरोना व्हायरसच्या या संकटाच्या काळात आम्ही देशासोबत ठामपणे उभे आहोत’ असं सीआरपीएफने म्हटलं आहे. सीआरपीएफच्या जवानांनी आणि अधिकाऱ्यांनी 33 कोटी 81 लाख रुपयांचा धनादेश पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमध्ये जमा केला आहे. यासोबतच गुरुवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रविशंकर प्रसाद आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे. शिवसेना खासदार, आमदारांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विटद्वारे दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : 'भारतात फक्त 21 नव्हे तर 49 दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक'
Coronavirus: चिंताजनक! भारतात कोरोनाचा धोका वाढला; महाराष्ट्रात ५ दिवसात आढळले १०० नवे रुग्ण
coronavirus : अमेरिका, युरोपमध्ये कोरोनाचे थैमान, जगभरात मृतांचा आकडा 34 हजारावर
Coronavirus: 7 एप्रिलपर्यंत 'हे' राज्य होणार कोरोनामुक्त; खुद्द मुख्यमंत्र्यांचीच भविष्यवाणी