मुंबई - लाॅकडाऊनमुळे चोवीस तास घरातच अडकून पडल्यामुळे व बऱ्याच कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ दिले असल्याने दिवसाला मिळणारा दिड ते दोन जीबी इंटरनेट डेटा पुरेनासा झाला आहे. व्हिडिओ काॅल्स, यु- टुब, फेसबुक आणि इतर माध्यमाचा वापर वाढल्याने मिळणारा मर्यादित इंटरनेट डेटा आता कमी पडत आहे. जानेवारी महिन्यापासून व्हीडिओ कॅलिंगचे प्रमाण वाढले असून नेटिझन्स आपल्या आप्तेष्टांशी, सहकाऱ्यांशी याच माध्यमातून संवाद साधत आहे.
आयटी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम दिले आहे. त्यानिमित्ताने होणारी व्हिडिओ कॉन्फरन्स, फाईल ट्रान्स्फर व इतर कामांसाठी होणारा इंटरनेटचा वापर वाढला आहे. तसेच चोवीस तास घरात अडकून पडलेले अनेकांचा ऑनलाईन वापर वाढल्याचे चित्र आहे. यानिमित्ताने ऑनलाईन व्हिडिओ पाहणे, गेम खेळणे, वेब सिरीज, फेसबुक, इंस्टाग्रामवर लोकांचा वावर वाढला असल्याने दिवसाला मिळणारा मर्यादित इंटरनेट डेटा पुरेनासा झाला आहे. त्याचप्रमाणे, काही नागरिक परदेशांत आणि बाहेरगावीही अडकल्याने त्यांची खुशाली विचारण्यासाठी याच माध्यमांचा सर्वाधिक वापर होत असल्याचे माहिती तंत्रज्ञानाच्या निरीक्षणातून आढळले आहे.
सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोक ऑनलाईन असल्याने इंटरनेटचा वेग कमी झाल्याची नागरिक ओरड करत आहेत. यामुळे राऊटर, वाय फाय यांच्या वापरात वाढ झाली आहे. तसेच मोबाईल वरील इंटरनेटचा मर्यादित वापर संपल्यावर अगाऊ रिजार्ज सुद्धा लोक करीत आहेत. थोड्या महिण्यापूर्वीच सेवा पुरविणाऱ्या सर्वच कंपन्यांनी आपल्या रिजार्ज दरामध्ये वाढ केली होती. हि वाढ पचवत आज लाॅकडाऊनच्या काळात लोक मोठ्या प्रमाणावर इंटरनेटचा वापर करत आहेत. मनोरंजन तसेच माहितीचे वेगवेगळे पर्याय इंटरनेट उपलब्ध असल्यामुळे व व्हिडीओ काॅलिंग सारख्या सुविधेमुळे लोकांच्या इंटरनेट वापरात कमालीची वाढ झाली आहे.