हैदराबाद - जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 82 लाखांवर गेली आहे. तर तब्बल चार लाखांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील रुग्णांची संख्यादेखील सातत्याने वाढत आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन लाखांचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशभरात कोरोनाचे तब्बल 10,974 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना एक दिलासादायक घटना समोर आली आहे.
कोरोनावर मात करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापरही मोठ्या प्रमाणात केला जात आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी अहोरात्र कोरोनाग्रस्तांची सेवा करत आहेत. उपाचारासाठी त्यांना रुग्णांच्या जवळ जावं लागत आहे. अशा परिस्थिती आता या कोरोना योद्ध्यांना थोडासा दिलासा मिळणार आहे. स्मार्ट वॉच त्यांना मदत करणार आहे. कोरोना रुग्णाच्या जवळ न जाताच त्यांना त्यांची माहिती मिळणार आहे. आयआयटी हैदराबादच्या विद्यार्थ्यांनी असं भन्नाट उपकरण तयार केलं आहे.
विद्यार्थ्यांनी एक जबरदस्त घड्याळ तयार केले असून रुग्णाजवळ न जाताच ते डॉक्टरांना रुग्णांची माहिती देणार आहे. त्यामुळे अनेक गोष्टी सोप्या होणार असून ते फायदेशीर आहे. नेमोकेअर रक्षा प्लस असं या उपकरणाचं नाव आहे. नेमोकेअर रक्षा प्लसमुळे डॉक्टरांना रुग्णाजवळ जाऊन स्वत: तपासणी न करता त्याच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी, हार्ट रेट, रेस्पिरेटरी रेट आणि शरीराचं तापमान याची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांच्या आरोग्य परीक्षणात त्यांच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी तपासणं महत्त्वाचं असल्याचं सांगितलं आहे. कोरोना व्हायरसमुळे रुग्णांच्या शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी होऊ लागतं. वेळेत त्यांना ऑक्सिजन मिळाला नाही तर रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो. अशात हे उपकरण रुग्णाजवळ न जाता सातत्याने त्याच्या ऑक्सिजन पातळी तपासण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. तसेच यामध्ये जिओ ट्रॅकिंग फिचर आहे, ज्यामुळे उपकरण रुग्णाच्या मनगटावर बांधल्यानंतर रुग्णाच्या ठिकाणाची माहिती मिळू शकते.
नेमोकेअर कंपनीचं हे उपकरण असून नेमोकेअर रक्षाचे अपडेटेड व्हर्जन आहे. नवजात बालकांच्या तपासणीसाठी नेमोकेअर रक्षा तयार करण्यात आलं होते. बाळाला हात न लावता त्याची तपासणी केली जाऊ शकते. रक्षा प्लसमध्ये जिओ ट्रॅकिंग आणि खोकला मॉनिटर करण्याचे अधिक फीचर्स आहेत. सध्या या उपकरणाचं हैदराबाद आणि बंगळुरूतील दोन रुग्णालयात क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. ज्यामध्ये हे उपकरण परिणामकारक असल्याचं सांगितलं जातं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
एकीकडे चीन तर दुसरीकडे कोरोना; मोदी सरकारसमोर आहेत 'ही' 5 मोठी आव्हानं
CoronaVirus News : कोरोनाचा धोका वाढतोय; आता देशात दररोज तब्बल 3 लाख लोकांची होणार चाचणी
CoronaVirus News : कोरोनापासून संरक्षण करणार 'मोदी मास्क'?; लोकांनी दिला असा प्रतिसाद