मुंबई – गुगल इंडियाने आता कोरोना विषाणू संदर्भात आता मराठीत इत्थंभूत माहिती देणारे संकेतस्थळ नेटिझन्सच्या भेटीला आणले आहे. सध्या सोशल मीडीयावर विविध मेसेज, पोस्ट सर्रास शेअर होताना दिसतात. मात्र बऱ्याचदा त्याची विश्वासार्हता पडताळली जात नाही, त्यामुळे आता गुगल इंडियाने मराठी भाषेत कोरोना विषाणूला समर्पित असणारे नवे संकेतस्थळ आणले असून या माध्यमातून जागतिक पातळीपासून स्थानिक पातळीपर्यंतची माहिती सर्वसामान्यांना मिळणे सुलभ होणार आहे.
या संकेतस्थळावर कोरोना (कोविड-१९) ची लक्षणे, हेल्पलाईन क्रमांक, उपचार पद्धती, प्रतिबंधात्मक उपाय, सांख्यिक माहिती असा सर्व तपशील असणार आहे. गुगल इंडियाचे www.google.com/covid19
हे संकेतस्थळ मराठीसह इंग्रजी आणि हिंदी भाषेतही उपलब्ध आहे. या संकेतस्थळाचे वर्गीकरण तीन टप्प्यांत केले असून त्यात आरोग्यविषयक माहिती, सुरक्षा व प्रतिबंधात्मक उपाय, सांख्यिक माहिती व स्त्रोत यांचा समावेश आहे. आऱोग्यविषयक साक्षरता आणि सामान्यांमध्ये जनजागृती व्हावी या दृष्टीकोनातून गुगलने हा उपक्रम हात घेतला आहे.
कोरोनाविषयक माहितीसह या संकेतस्थळात घरी बसून विलगीकऱण वा अलगीकरण प्रक्रियेत काय करावे, हात धुण्याची योग्य पद्धत, सामाजिक अंतर कसे राखावे, स्व विलगीकरण म्हणजे काय, कोरोनाविषयीच्या अद्ययावत वार्ता या सर्वांचा देखील समावेश असणार आहे. यापूर्वीही, गुगल मॅपवर नवे फिचर सुरु केले असून त्यानुसार आता लॉकडाऊन काळात जेवण आणि राहण्याची सोय असलेली केंद्र दिसणार आहेत. गुगल मॅपचे हे वैशिष्ट्य सध्या देशातील ३० शहरांमध्ये काम करणार आहे. हे वैशिष्ट्य, गुगल मॅपच्या सर्च आणि असिस्टंटच्या मदतीने लोकांना मदत केंद्रात पोहोचण्यास मदत करणार आहे. अन्न, निवारा किंवा रात्री निवारा शोधण्यासाठी वापरकर्ते टाइप करून किंवा बोलून गुगलला आदेश देऊ शकतात.