कानपूर – देशात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या २ महिन्यापासून देशव्यापी लॉकडाऊन सुरु होतं, मात्र आता अनलॉक १ च्या पहिल्या टप्प्यात सरकारकडून काही भागात शिथिलता आणण्यात आली आहे. त्यामुळे बस, रेल्वे, बाजारात पुन्हा एकदा गर्दी होण्याची आशंका आहे. या गर्दीत कोरोना संक्रमित रुग्ण शोधून काढणे जिकरीचं जाणार आहे. मात्र हार्टकोर्ट बटलर टेक्निकल युनिवर्सिच्या विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाच्या मदतीनं हे काम सोप्प केलं आहे.
एचबीटीयूच्या विद्यार्थ्यांनी व्हर्चुअल रिएलिटी बॉक्स बनवला आहे ज्यामधून गर्दीतही कोरोना संक्रमित व्यक्ती शोधण्यात मदत होणार आहे. यामुळे रेल्वे, बस स्टॅंड तसेच गर्दीच्या ठिकाणी जास्त तापमान असणारे संक्रमित लोक सहज सापडतील. यामध्ये एका व्यक्तीची पीपीई किट आणि संपूर्ण सुरक्षेत थर्मल कॅमेरा, मोबाईलला कनेक्ट व्हर्चुअल रिएलिटी बॉक्स डोळ्यावर लावावा लागेल. थर्मल कॅमेऱ्याची रेंज ५ ते ७ मीटर असेल. गर्दीमध्ये इंफ्रारेड तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जास्त तापमान असणारे लोक सापडतील, त्यांना बाजूला काढून त्यांची तपासणी करता येईल. त्यामुळे कोरोना संक्रमण रोखण्यास मदत होईल.
व्हर्चुअल रिएलिटी बॉक्सचा प्रोटोटाइप मॉडेल एचबीटीयूच्या माहिती तंत्रज्ञानच्या पहिल्या वर्गात शिकणाऱ्या स्वप्निल त्रिपाठी आणि प्रद्युम्न यांनी तयार केले आहे. त्यांना हे मॉडेल इनोवेशन अँन्ड इन्क्यूबेशन विभागाकडे दिलं होतं. त्यासोबत थर्मल कॅमेऱ्याची स्वस्त डिझाईन बनवण्यात आलं. विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी या मॉडेलला सरकारसमोर प्रस्तावित केले आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी सांगितले की, थर्मल कॅमेऱ्याला हेलमेट अथवा खांद्यावरही लावू शकता. याला मोबाईलशी कनेक्ट केले आहे. तर मोबाईल व्हर्चुअल रिएलिटी बॉक्सशी जोडला जाईल. थर्मल कॅमेरा गर्दीत लोकांचा व्हिडीओ घेईल, तो मोबाईलवर पाठवेल, यामधून कोणत्याही व्यक्तीचं तापमान जास्त असेल तर तो लगेच ओळखून येईल. थर्मल कॅमेरा ८ ते १० हजार रुपयापर्यंत येतो, तर वीआर बॉक्स ३०० ते ४०० रुपयांपर्यंत मिळतो.
इनोवेशन अँन्ड इन्क्यूबेशन विभागाचे प्रमुख प्रा. नरेंद्र कोहली यांनी सांगितले की, थर्मल कॅमेरातून आलेल्या व्हिडीओ सेकंदात पूर्ण स्थिती स्पष्ट करेल. विद्यार्थ्यांनी हे मॉडेल विकसित केले आहे. स्वस्तातला थर्मल कॅमेरा तयार केला जात आहे. मॉडेल आणि तांत्रिक बाबी विकसित झाल्यानंतर त्यांचे स्टार्टअप केले जाईल. यामुळे एकाच वेळी अनेक लोकांची तपासणी करता येईल.