दिल्ली एम्सचे सर्व्हर हॅक करण्याचं प्रकरण ताजं असतानाच आता सायबर हॅकर्सनी आयसीएमआरच्या वेबसाईटवर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. एम्सनंतर सायबर हल्लेखोरांनी आता भारतातील इतर आरोग्य आणि संशोधन संस्थांच्या वेबसाईट्स आणि रुग्ण माहिती प्रणालींना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. NIC म्हणजेच नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरच्या एका सरकारी अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, 30 नोव्हेंबर रोजी सायबर हॅकर्सनी ICMR अर्थात इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या वेबसाईटवर 24 तासांच्या कालावधीत सहा हजारांहून अधिक वेळा अटॅक करण्याचा प्रयत्न केला.
मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार, ICMR च्या वेबसाईटवर अटॅक करणाऱ्या हल्लेखोरांच्या तपशीलाबद्दल विचारले असता, अधिकाऱ्याने सांगितले की, ICMR च्या वेबसाईटवर हे अटॅक हाँगकाँग-आधारित ब्लॅकलिस्टेड आयपी अॅड्रेस 103.152.220.133 वरून करण्यात आले होते. तथापि, सायबर हल्लेखोरांना रोखण्यात आले आणि ते त्यांच्या नापाक योजनांमध्ये यशस्वी होऊ शकले नाहीत. याबाबत आम्ही टीमला अलर्ट केल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.
जर फायरवॉलमध्ये काही त्रुटी असतील (फायरवॉल सिस्टमला व्हायरसपासून संरक्षित करण्यासाठी सुरक्षा यंत्रणा), तर हॅकर्स वेबसाईटची सुरक्षा तोडण्यात यशस्वी होऊ शकतात.आयसीएमआरच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, NIC ने सरकारी संस्थांना फायरवॉल अपडेट ठेवण्यास सांगितले आहे. ते म्हणाले, 'एनआयसीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे नियमितपणे पालन करावे लागेल.
सरकारी संस्थांना ऑपरेटिंग सिस्टमचा सिक्युरिटी पॅच अपडेट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अधिकाऱ्याने सांगितले की 2020 पासून आरोग्य संस्थेच्या वेबसाइटवर सायबर अटॅक वाढले आहेत. विशेष म्हणजे, यापूर्वी दिल्ली एम्सचा सर्व्हर हॅक झाला होता. बुधवारी सकाळी एम्समधील धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अटॅकमुळे सुमारे 3-4 कोटी रुग्णांच्या डेटावर परिणाम होण्याची भीती आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"