मोबाईल सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांमध्ये गेल्या तीन वर्षांपासून रंगलेले टेरिफ युद्ध आता संपायच्या वाटेवर आहे. आता एफयुपीच्या नव्या वादाने डोके वर काढले असून जिओ, व्होडाफोन, एअरटेल या कंपन्यांनी त्यांचे रिचार्जचे दर वाढविले आहेत. मात्र, आजही इनकमिंग कॉल मोफत दिले जात आहेत.
मोबाईल सेवेने बाळसे धरलेले तेव्हा साधारण 15 वर्षांपूर्वी इनकमिंग कॉल आणि आऊट गोईंग कॉलसाठी पैसे मोजावे लागत होते. यानंतर इनकमिंग कॉलची सुविधा मोफत मिळू लागली होती. याचाच अर्थ केवळ जो कॉल करणार आहे त्यालाच पैसे मोजावे लागत होते. यानंतर सेकंदाप्रमाणे पैसे आकारणी सुरू झाली. टाटाने जपानची कंपनी डोकोमोसोबत करार करत ही सुविधा दिली होती. त्यानंतर 10 पैसे, 20 पैसे, 30 पैसे कॉल अशा खैराती सुरू झाल्या. इंटरनेटनेही कात टाकली होती. टूजीची जागा थ्रीजीने घेतली. त्यासाठी वेगळे पॅक. अशी लूट सुरू असताना अचानक जिओने एन्ट्री घेतली आणि पुन्हा 120 ते 150 रुपयांत महिनाभर मोफत कॉलिंग आणि फोर जी इंटरनेट फ्री दिल्यावर एकच झुंबड उडाली होती.
जिओच्या या खेळीने गेल्या 15 वर्षांपासून लुबाडणाऱ्या टेलिकॉम कंपन्यांचे कंबरडेच मोडले होते. उगाचच रिंगटोन चार्ज, कॉलर ट्यून चार्ज आदी मार्गांनी लूट करणाऱ्या कंपन्यांचे धाबे दणाणले आणि त्यांनीही जिओच्या तोडीला रिचार्जची रक्कम आणून ठेवली. मात्र, तोपर्यंत करोडो युजरनी जिओकडे मोर्चा वळविला होता. आता जिओवरून मोफत कॉलिंग सुरू असल्याने लोकांनी अन्य नेटवर्कच्या नंबरवर जिओवरून कॉल करण्यास सुरूवात केली. कंपन्यांमधील करारनुसार एफयुपी प्रमाणे जिओला या कंपन्यांना पैसे द्यावे लागत होते. यामुळे जिओने रिंगची वेळ कमी करणे, कॉल न लागणे असे हातखंडे चालविण्यास सुरूवात केली. यावरून वाद सुरू झाला. व्होडाफोनला कधी नव्हे तो 50 हजार कोटींचा फटका सोसावा लागला.
आता अन्य नेटवर्कवर कॉल करायचा असल्यास युजरला 6 पैसे मिनिटाला मोजावे लागणार आहेत. यामुळे रिचार्जची किंमत वाढली आहे. अशातच येत्या तीन ते चार तिमाहींमध्ये इनकमिंग कॉल मोफत देण्याची सुविधाही बंद होणार असल्याचे संकेत विश्लेषकांनी दिले आहे. यामुळे पूर्वीसारखे दर नसले तरीही पूर्वीचे इनकमिंगलाही पैसे मोजण्याचे दिवस परत येण्याची चिन्हे आहेत.