मुंबई : कालपासून टेलिकॉम कंपन्यांनी अनलिमिटेड फ्री कॉलिंग बंद केले आहे. तसेच अन्य नेटवर्कवरही कॉल लिमिट ठरविली आहे. एवढेच नाही तर टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या प्रिपेड प्लॅनच्या दरांमध्येही वाढ केली आहे. आता या कंपन्या आणखी एक मोठा झटका देण्याच्या तयारीत आहेत.
भारती एअरटेल, व्होडाफोन आणि रिलायन्स जिओने टेलिकॉम रेग्यूलेटर ट्रायला डेटा सर्व्हिसच्या वेगळ्या किंमतीचा प्रस्ताव दिला आहे. ट्रायला दिलेल्या पत्रात सीओएआयचे संचालक रंजन मॅथ्यूज यांनी सांगितले की, या वेळी बाजारात असलेल्या स्पर्धेमुळे कंपन्यांना टॅरिफमध्ये सुधारणा करण्याची शक्यता कमी आहे. यामुळे या कंपन्या मोबाईल डेटासाठी एक कमीतकमी दर लागू करू शकतात.
मोबाईल डेटा आणि कॉलिंग आता ग्राहकांची गरज बनले आहे. यामुळे सध्याची स्थिती पाहता दर ठरविण्यात यावेत. भारतातील मोबाईल डेटाची किंमत विकसनशील देशांच्या तुलनेत 50 पटींनी कमी आहे, या तीन्ही कंपन्या ट्रायला यामुळे एक दर ठरवून देण्याची मागणी करत आहेत.
मॅथ्यूज यांनी म्हटलेल्या पत्रात ट्रायने हा प्रस्ताव लवकरात लवकर स्वीकारावा जेणेकरून टेलिकॉम क्षेत्र विकासाकडे जाईल. सध्याच्या घडीला टेलिकॉम क्षेत्रावर 7.5 लाख कोटींचे कर्ज आहे. तसेच नुकत्याच आलेल्या थकीत रकमेच्या दंडामुळे हा भार आणखी वाढला आहे. ट्रायने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार कंपन्यांना एका ग्राहकाकडून महिन्याला 80 रुपये मिळतात. 2010 मध्ये हेच उत्पन्न 141 रुपये होते. तर 2017 मध्ये 117 रुपये होते.