डेल कंपनीने भारतीय युजर्ससाठी आपला इन्स्पीरॉन १५ ७००० हा अतिशय गतीमान असा गेमिंग लॅपटॉप सादर करण्याची घोषणा केली आहे.
डेल कंपनीने या वर्षाच्या मे महिन्यात आपले डेल इन्स्पीरॉन १५ ७००० हे मॉडेल लाँच केले होते. मात्र यात काही नवीन फिचर्सचा समावेश करत याची अद्ययावत आवृत्ती ग्राहकांना सादर करण्यात आली आहे. या लॅपटॉपमध्ये १५.६ इंच आकारमानाचा आणि १९२० बाय १०८० पिक्सल्स अर्थात फुल एचडी क्षमतेचा एलईडी डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यात सातव्या पिढीतील अतिशय गतीमान असा इंटेल कोअर आय-७ हा प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. याच्या जोडीला एनव्हिडीयाचा अतिशय दर्जेदार असा जीफोर्स जीटीएक्स १०६० हे ग्राफीक प्रोसेसरदेखील प्रदान करण्यात आले आहे. यामुळे या लॅपटॉपवर उच्च ग्राफीक्सयुक्त गेम्सचा आनंद घेणे शक्य आहे. याची रॅम १६ जीबी असून ती ३२ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे.
गेमिंगमध्ये लॅपटॉप तापण्याची समस्या भेडसावत असते. यावर मात करण्यासाठी यात अतिशय उत्तम दर्जाची शीतकरण प्रणाली देण्यात आली आहे. यात ड्युअल फॅन्स, वाढीवर आकारांचे पाईप्स आणि हिट एक्सचेंजर्सचा समावेश आहे. या कुलींग सिस्टीममुळे यावर दीर्घ काळापर्यंत गेमिंग केले तरी हा लॅपटॉप तापत नसल्याचा डेल कंपनीने दावा केला आहे. गेमिंगमध्ये ध्वनी हादेखील महत्वाचा घटक असतो. यासाठी यात वेव्ह मॅक्स ऑडिओ प्रो या प्रणालीचा अंतर्भाव करण्यात आला आहे. यामुळे यात अतिशय उत्तम क्वालिटीच्या ध्वनीची अनुभूती घेता येते. यातील बॅटरी ५६ वॅट क्षमतेची असून ती दीर्घ काळापर्यंतचा बॅकअप देत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तर हा लॅपटॉप विंडोज १० या ऑपरेटींग सिस्टीमवर चालणारा असेल. यात स्मार्ट बाईट हे सॉफ्टवेअर देण्यात आले आहे. याच्या मदतीने डिस्प्लेवर उच्च दर्जाचे व्हिज्युअल्स दिसते. डेल इन्स्पीरॉन १५ ७००० या लॅपटॉपच्या विविध व्हेरियंटचे मूल्य १,२७,३९० रूपयांपासून सुरू होणारे आहे.