नवी दिल्ली : मॅसेंजिंग अॅप व्हॉट्सअॅपने बल्कमध्ये मॅसेज पाठविणाऱ्यांना चांगलाच दणका दिला आहे. भारतासह अनेक देशांनी कडक पाऊल उचलल्यावर कंपनीने ही कारवाई केली आहे. WhatsApp अशी मशीन लर्निंग सिस्टिम बनविली आहे, जिच्या आधारे खोटे मॅसेज किंवा मोठ्या प्रमाणावर मॅसेज पाठविणाऱ्यांचा नंबरच बंद करण्यात आला आहे. असे जवळपास दर महिन्याला 20 लाख अकाऊंट WhatsApp बंद करत आहे. महत्वाचे म्हणजे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या पीएचाही नंबर व्हॉट्सअॅपने बंद केला होता.
मशीन लर्निंग सिस्टिम द्वारे एकाचवेळी अनेकांना मॅसेज करणाऱ्या व्यक्तींना शोधले जाते. यामध्ये ही व्यक्ती काय माहिती पाठवत आहे, याबाबत पडताळणी केली जाते. या प्रकाराला बल्क मॅसेजिंग म्ह़टले जाते. या प्रणालीच्या वापराने व्हॉट्सअॅप कंटेंट शेअरिंगवरही लगाम घालण्याचा प्रयत्न करत आहे.
WhatsApp सांगितले आहे की मॅसेंजिंग अॅपचा वापर राजकीय लोकांकडून जास्त केला जातो. तसेच अन्य लोकांकडून केवळ फेक न्यूजच नाहीत तर असे काही लिंक पाठविण्यात येतात ज्याद्वारे त्या व्यक्तीची खासगी माहिती चोरली जाऊ शकते. अशा प्रकारे बल्क आणि अॅटो मॅसेज करणे कंपनीच्या नियमांच्या विरोधात असल्याचे व्हॉट्सअॅपने म्हटले आहे.
ही सिस्टिम कशी काम करते...
WhatsApp ने सांगितले की ही सिस्टिम अशा नंबरचा शोध लावते जे अपमानकारक माहिती पसरवितात. तसेच चुकीचा मॅसेज पाठविणाऱ्यांना पकडले जाते. यानंतर हा युजर जेव्हा पुन्हा हा नंबर व्हॉट्सअॅपवर सुरु करायला जातो, तेव्हा सिस्टिम त्याला बॅन केल्याचा मॅसेज दाखविते. याप्रकारे तीन महिन्यांत 20 टक्के अकाऊंट बॅन करण्यात आली आहेत. ही प्रक्रिया मानवाद्वारे करणे शक्य नसल्याने त्यासाठी ही प्रणाली बनविण्यात आली आहे.
विधान परिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांचे जनसंपर्क अधिकारी प्रशांत जोशी यांचे व्हॉट्सअॅप असेच बंद करण्यात आल्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, 'आपला फोन नंबर व्हॉट्सअॅपसाठी बॅन करण्यात आल्याचा मेसेज' व्हॉट्सअॅपकडून त्यांना येत होता. प्रशांत जोशी हे गेल्या 13 वर्षांपासून मुंडे यांचे स्वीय सहायक म्हणून काम पाहतात. सध्या ते धनंजय मुंडेंसोबत राष्ट्रवादीच्या 'निर्धार परिवर्तनाचा' या यात्रेचं मीडिया मॅनेजमेंट करत आहेत. विरोधी पक्षनेत्याच्या पीआरओच्या फोनवर नजर ठेवणं, त्यांचा नंबर बॅन करणं, त्यांच्या फोनवर बंदी आणणं, म्हणजे देशात आणीबाणी लागू करण्यासारखंच असल्याचा आरोपही मुंडे यांनी केला होता.