केंद्र शासनाने आधी जाहीर केलेली डिजीटल स्मार्ट वीज मीटरची योजना अंतिम टप्प्यात असून यात अत्याधुनीक फिचर्ससह सीमकार्डही असणार आहे. आपण आधुनीक युगात वावरत असतांना प्रत्येक घटक स्मार्ट बनत आहे. यात आता वीज मीटरची भर पडणार आहे. देशात आधी अॅनॉलॉग वीज मीटर वापरले जात असत. सुमारे दोन दशकांपूर्वी याच्या ऐवजी डिजीटल वीज मीटर अस्तित्वात आले. अर्थात प्रत्येक घरात डिजीटल वीज मीटर पुरवण्यासाठी कित्येक वर्षे गेली तरी हे काम पूर्णपणे पार पडले असे कुणी म्हणू शकणार नाही. यातच आता विद्यमान डिजीटल वीज मीटर बदलण्याचे संकेत मिळाले आहेत. याच्या ऐवजी स्मार्ट डिजीटल वीज मीटर लागणार आहेत. यातील पहिला टप्पा ५० लाख मीटर्सचा असून हे मीटर उत्तरप्रदेश आणि हरियाणा या राज्यांमध्ये लागणार आहेत.
यानंतर बिहार, दिल्ली, गुजरात आणि अन्य राज्यांमध्ये स्मार्ट डिजीटल वीज मीटर लावण्याचे केंद्र सरकारचे नियोजन आहे. या अनुषंगाने पहिल्या टप्प्यातील ५० लाख स्मार्ट मीटर्ससाठी जागतिक पातळीवरून निविदा मागविण्यात आल्या आहेत. यात व्होडाफोन, टेक महेंद्रा, एल अँड टी आदींसह देशी-विदेशी कंपन्यांनी स्वारस्य दाखविले असून याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. केंद्रीय उर्जा मंत्रालयाशी संलग्न असणार्या एनर्जी एफीशन्सी सर्व्हीसेस लिमिटेड म्हणजेच इइएसएल या संस्थेकडे स्मार्ट वीज मीटरची जबाबदारी टाकण्यात आली आहे.
केंद्र सरकारने देशातील प्रत्येक घरात अव्याहतपणे वीज पुरविण्यासाठी नॅशनल स्मार्ट ग्रीड मिशनची घोषणा केली आहे. याच्या मुख्य उद्दीष्टांमध्ये वीज गळती व वीज चोरी आदींना आळा घालण्याचा समावेश आहे. यासाठी विविध तंत्रज्ञानांचा वापर करण्यात येत असून त्यातील महत्वाचा घटक म्हणजेच स्मार्ट डिजीटल वीज मीटर होय. यात इंटरनेट ऑफ थिंग्ज तसेच विविध सेन्सर्सचा उपयोग केला जाणार आहे. सर्वात लक्षणीय बाब म्हणजे यात सीमकार्डदेखील असेल. स्मार्ट डिजीटल वीज मीटर हे दिसायला सध्याच्या डिजीटल मीटरप्रमाणेच असले तरी यात नाविन्यपूर्ण बाबींचा समावेश असेल. याच्या मदतीने युजर (मीटरधारक) आणि वीज पुरवठादार (उदा. वीज वितरण कंपनी अथवा अन्य) एकाच वेळी त्याच्या घरात अथवा व्यावसायिक ठिकाणी नेमक्या किती विजेचा वापर होतोय? हे पाहू शकतो. याच्या मदतीने अगदी रिअलटाईम ट्रॅकींगची सुविधादेखील असेल. कुणी मीटरशी छेडछाडच नव्हे तर अगदी स्पर्श जरी केला तरी याची नोंद होणार आहे. यामुळे मॅन्युअल अथवा रिमोटसारख्या अत्याधुनीक प्रकारांनी होणार्या वीज चोरीला सहजपणे आळा बसेल अशी शक्यता आहे.
यात असणारे सीमकार्ड हे जीपीआरएस (टू-जी व थ्री-जी:-जीएसएम) नेटवर्कला सपोर्ट करणारे असेल. याच्या मदतीने संबंधीत स्मार्ट डिजीटल वीज मीटरची इत्यंभूत माहिती युजर आणि वीज कंपनीला मिळेल. यामुळे ग्राहक व कंपनीतील अनेक संभाव्य वाद नाहीसे होण्याची शक्यता आहे. याच्या मदतीने घरासह परिसरातील वीज गळती, तसेच पाणी, गॅस आदींच्या लिकेजची माहितीदेखील मिळण्याची शक्यता असून यासाठी आयओटी अर्थात इंटरनेट ऑफ थिंग्ज या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. स्मार्ट डिजीटल वीज मीटरमुळे वीज वहन आणि पुरवठ्यात अभूतपुर्व क्रांती घडून येईल असे मानले जात आहे. यामुळे प्रत्येक घरी जाऊन मीटरचे रिडींग घेणे, ग्राहकाला वीज बील देणे, त्याने बील न भरल्यास वीज पुरवठा तोडणे यासाठी भविष्यात कर्मचार्यांची गरज भासणार नाही.
तर हे सर्व काम रिमोट पध्दतीने करता येईल. तर वीज बील भरण्याची प्रक्रिया एखाद्या मोबाईल चार्जींगप्रमाणे अतिशय सुलभ होईल. विशेष म्हणजे यामुळे वीज गळती आणि चोरीला आळा बसण्याची शक्यता आहे. स्मार्ट डिजीटल वीज मीटर प्रणालीस दोन टप्प्यात विभाजीत करण्यात आले असून यातील पहिल्या टप्प्याबाबतचा तपशील लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.