मोटोरोलाच्या मोटो जी५एस आणि जी५एस प्लस या स्मार्टफोन्सवर आता प्रत्येकी २ हजार रूपयांचा डिस्काऊंट जाहीर करण्यात आला असून ग्राहकांना हे मॉडेल्स अमेझॉन इंडियावरून खरेदी करता येणार आहे. लेनोव्होची मालकी असणार्या मोटोरोला मोबॅलिटी कंपनीने ऑगस्ट महिन्यात भारतीय ग्राहकांसाठी जी५एस व जी५एस प्लस हे दोन स्मार्टफोन्स अनुक्रमे १३,९९९ आणि १५,९९९ रूपये मूल्यात सादर केेले होते. अमेझॉन इंडियाने आता या दोन्ही मॉडेल्सवर दोन हजार रूपयांची सूट जाहीर केली आहे. यामुळे हे दोन्ही स्मार्टफोन्स अनुक्रमे ११,९९९ आणि १३,९९९ रूपये मूल्यात ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत. सध्या तरी ही ऑफर फक्त अमेझॉन इंडियावरच सादर करण्यात आली आहे. यामुळे हा डिस्काऊंट मर्यादीत कालखंडासाठी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मोटो जी ५ एसमध्ये ५.२ इंच तर मोटो जी ५ एस प्लस या मॉडेलमध्ये ५.५ इंच आकारमानाचा आणि १९२० बाय १०८० पिक्सल्स म्हणजेच फुल एचडी क्षमतेचा अमोलेड डिस्प्ले असून यावर कॉर्निंग गोरीला ग्लास ३ चे संरक्षक आवरण असेल. मोटो जी ५ एसमध्ये ऑक्टॉ-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४३० प्रोसेसर तर मोटो जी ५ एस प्लस मॉडेलमध्ये ऑक्टॉकोअर ६२५ प्रोसेसर देण्यात आला आहे. मोटो जी ५ एसची रॅम तीन जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी आहे. तर मोटो जी ५ एस प्लस मध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोअरेज आहे. दोन्ही मॉडेलमध्ये इनबिल्ट स्टोअरेज मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविता येणार आहे.
मोटो जी ५ एस या स्मार्टफोनमध्ये १६ मेगापिक्सल्सचा मुख्य तर ८ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तर मोटो जी ५ एस प्लस या मॉडेलमध्ये १३ मेगापिक्सल्सचे दोन कॅमेरे असून यातील एक मोनोक्रोम तर दुसरा आरजीबी असेल. तर या मॉडेलमध्ये एलईडी फ्लॅश, वाईड अँगल लेन्स आणि एफ/२.० अपार्चरसह ८ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा असेल. या स्मार्टफोनमध्ये टर्बो पॉवर चार्जरसह ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी आहे. हे दोन्ही स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ७.१.१ नोगट या आवृत्तीवर चालणारे आहेत. यात फिंगरप्रिंट स्कॅनरसह वाय-फाय, ब्ल्यू-टुथ, जीपीएस/ए-जीपीएस, एनएफसी, युएसबी टाईप-सी, ऑडिओ जॅक, फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्क सपोर्ट आदी फिचर्स असतील.