ओप्पो कंपनीने आपल्या एफ७ या स्मार्टफोनच्या दोन्ही व्हेरियंटवर घसघशीत सवलत जाहीर केली असून ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही ग्राहकांना याचा लाभ होणार आहे. या वर्षाच्या प्रारंभी ओप्पो एफ७ या स्मार्टफोनला भारतीय बाजारपेठेत दोन व्हेरियंटमध्ये उतारण्यात आले होते. यातील ४ जीबी रॅम व ६४ जीबी स्टोअरेजचे मूल्य २१,९९० तर ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोअरेजच्या व्हेरियंटचे मूल्य २६,९९० रूपये होते. आता यातील पहिले व्हेरियंट हे दोन हजार रूपयांनी स्वस्त झाले असल्यामुळे ते ग्राहकांना १९,९९० रूपयात खरेदी करता येणार आहे. तर ६ जीबी रॅमयुक्त व्हेरियंटचे मूल्य तीन हजारांनी कमी करण्यात आले असून ते आता २३,९९० रूपयात मिळणार आहे. हा स्मार्टफोन अमेझॉन इंडिया, फ्लिपकार्ट आदी शॉपींग पोर्टल्ससह देशभरातील शॉपीजमधूनही उपलब्ध करण्यात आलेला आहे. अर्थात ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारात याला खरेदी करणार्या ग्राहकांसाठी ही सवलत लागू करण्यात आली आहे.
ओप्पो एफ ७ हा स्मार्टफोन आयफोन एक्स या मॉडेलप्रमाणेच डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले १९:९ गुणोत्तर असणारा, फुल स्क्रीन २.० या प्रकारातील तसेच ६.२३ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस ( २२८० बाय १०८० पिक्सल्स) क्षमतेचा आहे. यात ऑक्टा-कोअर मीडियाटेक हेलिओ पी६० हा प्रोसेसर देण्यात आला आहे. या मॉडेलमध्ये २५ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात एआय ब्युटी टेक्नॉलॉजी, रिअल टाईम प्रिव्ह्यू, एआर स्टीकर्स, बोके इफेक्ट आदी फिचर्स देण्यात आले आहेत. तर यातील मुख्य कॅमेरा १६ मेगापिक्सल्स क्षमतेचा असून यात एलईडी फ्लॅश आहे. याच्या जोडीला एआय अल्बम हे फिचर देण्यात आले आहे. याच्या अंतर्गत आर्टीफिशियल इंटिलेजीयन्सच्या मदतीने विविध वर्गीकरणाने युक्त असणारी फोटो लायब्ररी तयार करण्याची सुविधा देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन ३४०० मिलीअँपिअर क्षमतेच्या बॅटरीने सज्ज आहे. तर हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा असून यावर कंपनीचा कलरओएस ५.० हा युजर इंटरफेस देण्यात आला आहे.