लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : आयफोन रात्रभर चार्जिंगला ठेवून झोपू नका; कारण त्यामुळे फोन गरम होऊन पेट घेऊ शकतो, असा इशारा जगातील आघाडीची फोन उत्पादक कंपनी ‘ॲपल’ने जारी केला आहे.
आपल्या ग्राहकांसाठी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये ॲपलने म्हटले आहे की, जेव्हा फोन हा पॉवर ॲडाप्टर अथवा वायरलेस चार्जरद्वारे ऊर्जा स्रोताशी (पाॅवर सोर्स) जोडलेला असतो, तेव्हा त्याच्या जवळ झोपू नका. फोन रात्रभर चार्जिंगला ठेवून झोपी जाऊ नका. चार्जिंग सुरू असताना फोनवर बोलू नका. या सर्व बाबी धोकादायक आहेत. त्यामुळे फोन गरम होऊन पेट घेऊ शकतो. ॲपलने म्हटले की, चार्जिंग सुरू असताना फोन, पॉवर ॲडाप्टर अथवा वायरलेस चार्जर यांना हवेशीर ठिकाणी ठेवा.
अधिकृत चार्जरच वापराः ॲपलने म्हटले की, फोन चार्ज करण्यासाठी स्वस्त चार्जर वापरू नका. अधिकृत चार्जरनेच फोन चार्ज करा.
फोन उशीखाली ठेवणे टाळाः चार्जिंग सुरू असलेला फोन कांबळ, चादर अथवा उशीखाली ठेवू नका. त्याच प्रमाणे चार्ज झाल्यानंतरही फोन अशाप्रकारे कोणत्याही कपड्याखाली अथवा उशीखाली ठेवू नका.
का दिला इशारा? हजारो आयफोन वापरकर्त्यांनी फोन जास्त गरम होत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. फोन गरम होऊन हँग झाल्याच्या तक्रारीही अनेकांनी केल्या आहेत. त्यामुळे ॲपलने हा इशारा जारी केला आहे.