आयफोनने लवकरच दरवाजे आणि कार अनलॉक करण्याची सुविधा मिळणार असून आयओएस प्रणालीच्या आगामी अपडेटच्या माध्यमातून हे शक्य होणार आहे.
अॅपलने विकसित केलेल्या आयओएस या ऑपरेटींग सिस्टीमची नवीन आवृत्ती लवकरच दाखल होणार आहे. यात अनेक नवीन फिचर्सचा समावेश करण्यात येणार आहे. यातील सर्वात लक्षणीय बाब म्हणजे यात ‘एनएफसी’ म्हणजेच ‘निअर फिल्ड कम्युनिकेशन’ला अद्ययावत करण्यात येणार आहे. खरं तर, अॅपलने सुमारे चार वर्षांपासून म्हणजेच आयफोन ६ आणि त्यापुढील मॉडेल्समध्ये ‘एनएफसी’ तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सुविधा दिली आहे. याचा वापर करून ‘अॅपल पे’ प्रणालीच्या मदतीने पैशांचे व्यवहार करण्याची सुविधा अॅपलने आपल्या युजर्सला दिली आहे. मात्र आयओएसच्या आगामी अपडेटमध्ये ‘एनएफसी’ची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. यात पैशांच्या व्यवहारांसह स्मार्ट लॉक, इमारतींमध्ये वापरण्यात येणारी स्मार्ट सिक्युरिटी सिस्टीम तसेच विविध वाहनांमधील स्मार्ट लॉकचा सपोर्ट देण्यात येणार आहे. यामुळे युजर या विविध स्मार्ट लॉक्सला अनलॉक करू शकणार आहे. परिणामी कोणत्याही प्रकारची फिजीकल ‘की’ म्हणजेच चावीचा वापर न करतांनाही दरवाजे आणि कार अनलॉक करता येणार आहे. यासाठी फक्त त्या युजरला संबंधीत स्मार्ट लॉकजवळून आपला आयफोन न्यावा लागणार आहे.
अँड्रॉइड प्रणालीवर आधीच ‘एनएफसी’चा व्यापक प्रमाणात वापर करण्यात येत आहे. तर आयफोनवर फक्त ‘अॅपल पे’ पुरताच याचा वापर मर्यादीत करण्यात आला आहे. यामुळे आयओएसच्या आगामी आवृत्तीत याला अपडेट करण्यात येणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. साधारणपणे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे अपडेट येऊ शकते.