आज भारतीय सेल्स बायोलॉजिस्ट डॉक्टर कमल रणदिवे यांची 104वी जयंती आहे. त्यानिमित्ताने आज Goodle ने होम पेजवर खास Doodle प्रकाशित केले आहे. त्यांनी कॅन्सरसारख्या घातक रोगावरील संशोधनात महत्वाचे योगदान दिले होते. 1982 मध्ये भारत सरकारने त्यांना त्यांच्या संशोधनासाठी पद्मभूषण देऊन सम्मानित केले होते.
आजच्या गुगल होमपेजवरील डुडल Ibrahim Rayintakath यांनी बनवले आहे. या डूडलमध्ये डॉ. कमल रणदिवे एका प्रयोगशाळेत दिसत आहेत. कमल रणदिवे यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1917 साली पुण्यात झाला. तिथेच त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमधून आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले आणि कृषी महाविद्यालयातून एमएससी केली. पुढे त्यांनी मुंबई युनिव्हर्सिटीमधून पीएचडी केली.
कमल रणदिवे यांनी सुरुवातीच्या काळात कॅन्सरवर अनेक संशोधन केले. स्तनांचा कर्करोग आणि आनुवंशिकता यांच्यात संबंध असल्याचा प्रस्ताव ठेवल्यामुळे त्यांना ओळख मिळाली. असा प्रस्ताव ठेवणाऱ्या त्या पहिल्या संशोधक होत्या, पुढे संशोधकांनी याला दुजोरा देखील दिला.
11 एप्रिल 2001 मध्ये वयाच्या 83 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्या भारतीय महिला वैज्ञानिक संघ (IWSA) च्या संस्थापक सदस्या होत्या. IWSA चे 11 चॅप्टर देशभरात आहेत. कमल रणदिवे यांनी मुंबई येथील टाटा मेमेरीयल येथे काम देखील केले होते. 1989 मध्ये निवृत्तीनंतर त्यांनी ग्रामीण भागातील आरोग्य सेवकांना प्रशिक्षण देण्याचे काम देखील केले.