फँटसी स्पोर्ट्सबद्दल जेव्हा बोलले जाते तेव्हा भारतात Dream11 चे नाव यादीत सर्वप्रथम दिसते. आता या लोकप्रिय गेमिंग ऍपने कर्नाटकातील आपला कारभार बंद केला आहे. ड्रीम 11 च्या संस्थापकांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे. हा गुन्हा राज्यन सरकारच्या नव्या जुगार कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे दाखल करण्यात आला आहे.
कर्नाटकात जुगारासंबंधित ऑनलाईन गेम्सवर बंदी घातल्यानंतर देखील ड्रीम 11 ऍप राज्यात वापरता येत होते. त्यामुळे एका कॅब ड्रायव्हरने कंपनीच्या संस्थापकांच्या विरोधात बंगळुरूमध्ये गुन्हा दाखल केला आहे. या तक्रारीनंतर कंपनीने कर्नाटकातील आपला कारभार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती कंपनीने दिली आहे.
कर्नाटक राज्यात गेल्या आठवड्यात एक नवीन कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्यांतर्गत जुगार आणि ऑनलाईन पैसे लावून खेळण्यात येणाऱ्या गेम्सवर बंदी घालण्यात आली आहे. यात MPL, Halaplay, Ace2Three, RummyCulture आणि BalleBaazi अशा गेम्सचा समावेश आहे. या गेम्सने गेल्या आठवड्यात राज्यातील युजर्सवर बंदी घातली होती. तर काही गेम्स मोफत गेमप्ले देत होते. परंतु Dream11 बंदी नंतर देखील कर्नाटकातून वापरता येत होते.
कर्नाटक राज्य सरकारने नवीन कायदा लागू केला आहे, ज्यात जुगार संबंधित सर्व ऑनलाइन गेम्सवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. गेमिंग कंपन्या या कायद्याच्या विरोधात कोर्टात जाण्याची तयारी करत आहेत. All India Gaming Federation चे चीफ एग्जिक्यूटिव Roland Landers यांनी सर्व गेम्स मिळून राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधात कोर्टात जाणार असल्याचे सांगितले आहे.